ठाणे महापालिकेची जनाग्रह अॅपच्या जनजागृतीसाठी तारेवरची कसरत, पालिका कर्मचाऱ्यांपासून सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 05:23 PM2017-12-06T17:23:33+5:302017-12-06T17:26:40+5:30
जनाग्रह अॅपची प्रसिध्द करण्यास कमी पडलेल्या आणि त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीतही कमी गुण मिळविलेल्या ठाणे महापालिकेने आता या अॅपची जनजागृती आपल्या कर्मचाऱ्यांपासूनच सुरु केली आहे.
ठाणे - स्वच्छता अॅपच्या बाबतीत उदासीन धोरण राबविणाऱ्या ठाणे महापालिकेला या अॅप बाबत ठाणेकरांनी अल्प प्रतिसाद दिल्याने, आता या अॅपची जनजागृती स्वत:पासूनच करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपासून पालिका प्रशासनाने सुरु वात केली असून पालिका मुख्यालयात तसेच पालिकेच्या सर्व प्रभाग समितीमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना हा अँप डाउनलोड करण्यापासून सर्व प्रकारची माहिती बुधवारी देण्यात आली. याशिवाय हॉस्पिटल तसेच मॉलमध्ये जाऊन सुद्धा या अॅपचा वापर करण्यासाठी आवाहन करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे.
केंद्र शासनाने तयार केलेल्या जनाग्रह या स्वच्छता अॅप बाबत पालिका प्रशासनाने उदासीन धोरण स्वीकारल्यामुळे जा अॅपची जास्त प्रसिद्धी होऊ शकली नाही. परिणामी ठाण्यात फार कमी नागरिकांनी या अॅपचा वापर केला आहे. त्यानंतर आता पालिका प्रशासनाच्या वतीने या अॅपच्या जनजागृतीसाठी व्यापक स्वरूपात पावले उचलण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून शहरातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ०.१० नागरिकांनी स्वच्छ अॅप हे अॅप्लिकेशन डाउनलोड करणे आवश्यक आहे. यावर देशात त्या शहराचा रँक किती आहे हे अवलंबून आहे. २०११ च्या जनगणेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या १८.४१ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे ठाणे शहरातून ४५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी हा स्वच्छता अॅप डाउनलोड करणे आवश्यक होते. केंद्र सरकारचा भाग असलेले हे स्वच्छतेचे अॅप मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरु करण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षभरात ठाणे शहरात या अॅपच्या संदर्भात योग्य ती प्रसिद्धी न झाल्याने शहरात मोठ्या संख्येने नागरिकांना या अॅप बद्दल माहितीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मागील वर्षभरात ४५ हजार नागरिकांनी हा अॅप डाउनलोड करणे अपेक्षित असताना केवळ ७ हजार नागरिकांनीच हा अॅप डाउनलोड केला आहे. जर ४५ हजार नागरिकांनी हा अॅप डाउनलोड केला असता तर १५० मार्क ठाणे महापालिकेला मिळाले असते.
उशिरा जाग आलेल्या ठाणे महापालिकेने शहरातील मॉल, हॉस्पिटल तसेच सर्व पालिका कर्मचाऱ्यांना हा अॅप डाउनलोड करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यास सुरवात केली आहे. जनाग्रह अॅपच्या जनजागृतीसाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी केवळ जनजागृती करण्याचेच काम करणार आहेत. हा अॅप कशा पद्धतीने डाऊनलोड करायचा, तक्रारी कशा करायच्या, अशी सर्व माहिती पालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात देण्यात आली. आतापर्यंत १० हजार नागरिकांनी हा अॅप डाउनलोड केला असल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी तांत्रिक गोष्टींमुळे सरकारी संकेतस्थळावर ही संख्या दिसत नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.