धुळीचे प्रदुषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरु केली रस्त्यांची धुलाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 04:42 PM2018-01-12T16:42:42+5:302018-01-12T16:46:48+5:30
धुळीचे प्रदुषण रोखण्यासाठी अखेर ठाणे महापालिकेने रात्रीच्या सुमारास रस्त्यांची धुलाई सुरु केली आहे. त्यानुसार पहिला मान हा पोखरण नं. १ ला मिळाला असून या रस्त्याची धुलाई गुरुवारी रात्री करण्यात आली.
ठाणे - शहरातील धुळीचे प्रदुषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने आता तब्बल १४० किमीचे रस्ते धुवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी एका खाजगी एजेन्सीची नेमणूक करण्यात आली असून त्यामाध्यमातून आता रस्ते धुलाईची सुरवात झाली आहे. त्यानुसार गुरवारी रात्री पोखरण नं. १ पासून या कामाला सुरवात झाली आहे. दहा दिवसा आड अशा पध्दतीने प्रत्येक रस्ता धुतला जाणार असून यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले २० दशलक्ष लीटर पाणी वापरले जात आहे.
ठाणे महापालिका हद्दीत मागील वर्षीच्या तुलेत यंदा वाहनांच्या संख्येत १ लाख ०५ हजार ५३४ एवढी वाढ झाली आहे. त्यातही शहरातील दुचांकींची संख्या ही १० लाख ७६ हजार ५६४ एवढी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ ७२ हजार ७७३ एवढी झाली आहे. तर शहरात आजच्या घडीला एकूण १९ लाख २७ हजार १५५ वाहने असल्याचे पर्यावरण अहवालात नमुद करण्यात आले आहे. महापालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात शहरातील हवेतील धुळीकणांचे प्रमाण हे मानकापेक्षा मर्यादेपक्षा जास्त आढळून आले आहे. तर शहरातील मुख्य १६ चौकांच्या ठिकाणी हवेतील धुळीकणांचे प्रमाण हे मानकापेक्षा जास्त आढळले आहे.
दरम्यान, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत यावर उपाय योजना करण्याचे आदेश दिले असून अशा प्रकारचे रस्ते धुवण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार नगर अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून गुरुवार पासून शहरातील १४० किमी रस्त्यांची धुलाई सुरु झाली आहे. स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून रात्री १२ ते पहाटे चार वाजेपर्यंत हे रस्ते धुतले जात आहेत. यासाठी कोपरी येथील मलनिसारण प्रक्रिया केंद्रातील २० दशलक्ष लीटर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जाणार आहे. पालिका यासाठी १० टँकर उपलब्ध करणार आहे. प्रत्येक १० दिवसा आड अशा पध्दतीने या रस्त्यांची धुलाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात पोखरण नं. १ या रस्त्याची धुलाई गुरुवारी रात्री करण्यात आली आहे. तर टप्याटप्याने शहरातील इतर रस्त्यांची धुलाई देखील याच पध्दतीने केली जाणार असून धुळीचे प्रमाण कमी करुन प्रदुषणापासून मुक्तता करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.