ठाणे पालिकेची आता एसी शौचालये
By admin | Published: July 16, 2017 02:57 AM2017-07-16T02:57:12+5:302017-07-16T02:57:12+5:30
ठाणे महापालिकेने शहरातील विविध प्रकल्प बीओटी, पीपीपी तत्त्वावर राबवण्याचे निश्चित केले असताना आता शहरातील मुख्य रस्त्यांवर पीपीपी तत्त्वावरच उच्च दर्जाची
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेने शहरातील विविध प्रकल्प बीओटी, पीपीपी तत्त्वावर राबवण्याचे निश्चित केले असताना आता शहरातील मुख्य रस्त्यांवर पीपीपी तत्त्वावरच उच्च दर्जाची शौचालयेदेखील उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरात १६ ठिकाणी ती उभारली जाणार असून पुढील १५ वर्षांसाठी निगा, देखभालीसाठी खाजगी ठेकेदाराकडे दिली जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर येणार आहे.
शहराची लोकसंख्या २२.५० लाखांच्या आसपास आहे. शहरातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी शौचालयाची उपलब्धता करून देण्याची जबाबदारीसुद्धा पालिकेचीच आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक एक किमी अंतरावर सार्वजनिक शौचालय असावे, असे निर्देश आहेत. तसेच शहरात उच्च दर्जाचे शौचालय असावे, ही नागरिकांची मागणी विचारात घेऊन पालिका शहरातील मुख्य रस्त्यांवर वातानुकूलित सार्वजनिक शौचालये उभारणार आहे. यानुसार, शहरातील आनंदनगर जकातनाका, तलावपाळी, आर मॉलसमोर, टिकुजिनीवाडी रोड, मानपाडा, वर्तकनगरनाका, रोड नं. १६ वागळे इस्टेट, कळवानाका, मानपाडानाका, उथळसरनाका, कापूबावडीनाका, कासारवडवलीनाका, मिडोज (पवारनगर), शास्त्रीनगरनाका, नितीन कंपनी फायर ब्रिज आॅफिसपुढे, विटावा जकातनाका, गायमुख चौपाटी आदी ठिकाणी ती उभारली जाणार आहेत. ही शौचालये व मुताऱ्या बांधण्याचा खर्च संबंधित संस्था करणार आहे. तसेच शौचालयांसाठी वीज, पाणी व साफसफाईसाठी लागणारे मनुष्यबळ, इतर साधनसामग्रीसाठी येणारा भांडवली खर्च संस्थेमार्फत केला जाणार आहे.
- १६ जागांपैकी जेथे फूटओव्हर ब्रिज आहे तेथे दोन्ही बाजूंनी, तर जेथे फूटओव्हर ब्रिज नाही, अशा ठिकाणी ५० बाय २० आकाराचे दोन जाहिरातींचे होर्डिंग्ज व शौचालयाच्या भिंतीवर फलक उभारण्याची मुभा असणार आहे.
शहरात पालिका जागा उपलब्ध करून देणार आहे. शौचालयासाठी आवश्यक वीज व पाणीपुरवठा घेण्यासाठी पालिकेकडून नाहरकत दाखला देण्यात येणार आहे.