ठाणे महापालिका ‘खड्ड्यां’तच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:48 AM2017-07-28T00:48:10+5:302017-07-28T00:48:22+5:30
शहराच्या विविध भागांत पावसाने रस्त्यांची चाळण केली आहे. त्यासाठी वेगवेगळी आंदोलनेही झाली. त्यात तथ्य असल्याचे आता महापालिकेच्या प्रशासनानेच कबूल केले असून ४५१ खड्डे बुजवण्याचे शिल्लक असल्याचे सत्य उघड केले आहे.
ठाणे : शहराच्या विविध भागांत पावसाने रस्त्यांची चाळण केली आहे. त्यासाठी वेगवेगळी आंदोलनेही झाली. त्यात तथ्य असल्याचे आता महापालिकेच्या प्रशासनानेच कबूल केले असून ४५१ खड्डे बुजवण्याचे शिल्लक असल्याचे सत्य उघड केले आहे.
काही दिवसांवर महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा येऊन ठेपली आहे. पुढील महिन्यात गणेशोत्सवदेखील आहे. बुधवारी महापौरांनी मॅरेथॉन मार्गांची पाहणी केली असता, या मार्गांवर खड्डे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असून त्यांनी खड्डे बुजवण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत.
मागील काही दिवसांपासून शहरात मनसे आणि भाजपाच्या वतीने रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात आंदोलनदेखील झाले आहे. पालिकेच्या वतीने हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू असले, तरी त्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने अत्याधुनिक अशा जेट पॅचर मशीनचा आधार घेतला आहे. या यंत्रणेमुळे तत्काळ खड्डे बुजवणे शक्य होत असल्याचा पालिकेचा दावा आहे. यासाठी पालिकेने दोन कोटी मोजले आहेत. परंतु, ही यंत्रणादेखील कुचकामी ठरत असल्याचे दिसले आहे.
दरम्यान, महापालिका हद्दीत आजघडीला एकूण २९९५ चौरस मीटर क्षेत्रफळावर १३१४ खड्डे असून त्यातील १९८१ चौरस मीटर क्षेत्रफळावरील ८६३ खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यानुसार, सद्य:स्थितीत १०१८.१५ चौरस मीटर क्षेत्रफळावरील जागेत ४५१ खड्डेच शिल्लक असल्याचा दावा पालिकेने केला आहे. तेदेखील येत्या आठवडाभरात बुजवले जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
2995 चौरस मीटर क्षेत्रफळावर १३१४ खड्डे असून त्यातील १९८१ चौरस मीटर क्षेत्रफळावरील ८६३ खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यानुसार, सध्या ४५१ खड्डेच शिल्लक असून लवकरच ते बुजवले जातील.
खड्ड्यांच्या तक्रारींसाठी पालिकेने स्टार ग्रेड अॅप सुरू केले होते. परंतु, संबंधित ठेकेदाराचा कार्यकाळ संपल्याने आता हे अॅपही बंद झाले आहे. त्यामुळे शहरात नेमके किती खड्डे आहेत, याचा अंदाज पालिकेला मिळणे कठीण झाले आहे. हे अॅप सुरू करण्याबाबत हालचाली सुरू असल्या, तरी ते अद्यापही बंदच आहे.