ठाणे महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाची कोटींची उड्डाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:00 AM2019-06-02T01:00:12+5:302019-06-02T01:00:24+5:30
मे महिनाअखेर १६६ कोटींची विक्रमी वसुली । २६ कोटींची वाढ
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ३१ मेपर्यंत मालमत्ताकर भरला, तर त्यावर १० टक्के सूट दिली जात आहे. या संधीचा लाभ घेऊन अनेक करदात्यांनी बिले अदा केली आहेत. यामुळे यासाठी आता १५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. असे असले तरी ३१ मे २०१९ पर्यंत मालमत्ताकर विभागाने १६६ कोटींची वसुली केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत १४०.१३ कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र त्यात २६ कोटींची वाढ झाली आहे.
मालमत्ताकराचा भरणा करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मागील वर्षी या विभागाला ५५० कोटींचे टार्गेट दिले होते. यंदा त्यात वाढ करण्यात येऊन ते ६०० कोटी ठेवले आहे.
यामुळे पालिकेच्या मालमत्ताकर विभागाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता डोळ्यांसमोर ठेवून यंदा आधीच बिलांची छपाई केली होती. त्यानुसार, आचारसंहिता लागण्यापूर्वी तसेच आचारसंहितेच्या काळात लोकांच्या घरात ही बिले पोहोचवण्यात आली होती. त्यामुळेच मालमत्ताकराच्या उत्पन्नात यंदा वाढ झाल्याचे पालिकेने सांगितले.
दुसरीकडे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेसुद्धा यंदा ३१ मे पर्यंत तीन कोटी २६ लाखांची वसुली केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पालिकेच्या कारभारावर समाधान व्यक्त केले जात आहे.
मुंब्य्रातील वसुली उल्लेखनीय
दरवर्षी वसुलीत मागे राहणाऱ्या मुंब्य्रातूनसुद्धा पहिल्या टप्प्यात मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास एक कोटीची जास्त वसुली झाल्याचे दिसून आले आहे. ही बाब निश्चितच समाधानकारक आहे. तर, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीने यंदा पहिल्याच टप्प्यात ४६.५३ कोटींची विक्रमी वसुली केली आहे. मागील वर्षी ती ३५.०४ कोटींच्या आसपास होती. यंदा त्यात ११.४९ कोटींची वाढ झाली आहे.