पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती
By जितेंद्र कालेकर | Published: August 29, 2022 04:15 PM2022-08-29T16:15:45+5:302022-08-29T16:16:41+5:30
पर्यावरणाभिमुख शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ठाणे महापालिकेकडून उपाययोजना.
ठाणे: पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठीठाणे महानगरपालिका सज्ज असून गणेश मूर्तीं विसर्जनासाठी विसर्जन घाट, कृत्रिम तलावांची निर्मिती तसेच गणेश मूर्ती स्वीकृती केंद्रे तयार केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी दिली. पर्यावरणाभिमुख शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ठाणे महापालिका अनेक वर्षांपासून उपाययोजना करीत आहे. शहरांमधील तलावांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात येत आहे. या व्यवस्थेला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीही तशाच प्रकारची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विसर्जनाच्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठीही पालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
सात विसर्जन घाट- श्री गणेश मूर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने पारसिक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी, कळवा पूल, बाळकूम घाट आणि दिवा घाट असे एकूण सात विसर्जन घाट तयार केले आहेत. नागरिकांना विसर्जन सोहळा पाहता येण्यासाठी विशेष व्यवस्था, गणेश भक्तांच्या वाहनांसाठी वाहनतळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज राहणार आहे.
कृत्रिम तलावांची निर्मिती- शहरातील तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने मासुंदा तलाव, खारेगाव, न्यू शिवाजीनगर, ऋतूपार्क, खिडकाळी, दातीवली , वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव नं.१ आणि उपवन येथे या ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत.
श्रीगणेश मुर्ती स्वीकृती केंद्रे- महापालिकेने मासुंदा तलाव, मढवी हाऊस, वर्तकनगरमध्ये देवदयानगर, शिवाईनगर, चिरंजीवी हॉस्पीटल, महागिरी कोळीवाडा, कोपरी प्रभाग समिती कार्यालय, किसननगर बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, टेंभी नाका, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह आणि लोकमान्यनगर बस स्टॉप आदी ठिकाणी मूर्ती स्वीकार केंद्रे राहणार आहेत. त्याचप्रमाणे डिजी ठाणे प्रणालीद्वारेही विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग योजनाही राबविण्यात येणार आहे.
५० हजार अँन्टीजन किट- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची ठाणे महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँन्टीजन चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे. याठिकाणी भाविकांची अँन्टीजन चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास ५० हजार अँन्टीजन किट तयार ठेवण्यात येणार आहेत.
सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे - विसर्जनाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी विसर्जन महाघाट, सर्व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.