बाप्पाला निरोप देण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 02:40 AM2017-09-05T02:40:22+5:302017-09-05T02:40:42+5:30
दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी एकीकडे भक्तांकडून तयारी सुरू असतांनाच दुसरीकडे ठाणे महापालिकादेखील विसर्जनाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये
ठाणे : दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी एकीकडे भक्तांकडून तयारी सुरू असतांनाच दुसरीकडे ठाणे महापालिकादेखील विसर्जनाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि गणरायाचे विधिवत विसर्जन करण्यासाठी सज्ज झाली आहे. महाविसर्जन घाट, ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस बंदोबस्त, पालिकेचे कर्मचारी, कृत्रिम तलावांची निर्मिती आणि विविध ठिकाणी निर्माल्य स्वीकृती केंद्राच्या निर्मिती केल्याची माहिती प्रशासनाने दिली.
शहरांमधील तलावांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पर्यायी विसर्जन व्यवस्था केली आहे. गणेश मूर्तींंचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेने पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे विसर्जन महाघाट तयार केले आहेत. या ठिकाणी छोट्या गणेश मूर्तींबरोबरच ५ फुट आणि त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था केली आहे. महापालिकेने आरती स्थाने आणि निर्माल्य कलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना गणेश विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गणेश भक्तांच्या वाहनांसाठी वाहनतळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
दरम्यान येथे निर्माण करण्यात आलेले विसर्जन घाट हे भरती आणि ओहोटी लक्षात घेऊनच बांधले आहेत. शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलावाच्या बाजूला दोन कृत्रीम तलाव, उपवन येथे पालायदेवी मंदिराशेजारी व आंबेघोसाळे तलाव, निळकंठ वूडस् टिकुजीनीवाडी, बाळकुम रेवाळे व खारेगांव येथेही कृत्रीम तलाव निर्माण केले आहेत. या कृत्रीम तलावांच्या ठिकाणी आरतीस्थाने, निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध आहेत.
ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रीम तलावांच्या ठिकाणी श्री मूर्तींचे विसर्जन करता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी महापालिकेने मढवी हाऊस, वर्तकनगरमध्ये व्यंकटेश मंदीर, चिरंजीवी हॉस्पीटल, पोखरण रोड नं. २ येथे वसंतविहार संकुल प्रवेशद्वार, वागळे इस्टेट रोड नं.१६, मासुंदा तलाव, जेल तलाव परिसर, पाईप लाईन ब्रीज, १६ नं. पाईपलाईन ब्रीज, खिडकाळी, उपवन तलाव, खारीगाव, मॉडेला चेकनाका आदी ठिकाणी श्री गणेश मूर्ती स्वीकार केंद्रे उभारली आहेत. या केंद्रांवर प्राप्त होणाºया सर्व गणेश मूर्तींचे महापालिकेमार्फत विधिवत विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दहा दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी सुरक्षेची व्यवस्था पाहण्यासाठी पोलीस यंत्रणेबरोबरच महापालिकेचे सुरक्षारक्षक, अग्निशमन दलाचे जवान, एनसीसीचे विद्यार्थी, अनिरूद्ध अकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेचे ५०० प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करणार आहेत.
गणरायाच्या विसर्जनासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल
ठाणे : शहरातील विविध मार्गांवर मंगळवारी अनंत चतुर्दशीला होणाºया गणेश विसर्जनासाठीच्या भव्य मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे कुठेहीकोंडी होऊ नये, म्हणून वाहतूक मार्गांमध्ये बदल केल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी अधिसूचनेद्वारे दिली. मंगळवारी सकाळपासून सार्वजनिक आणि खासगी गणरायांच्या विसर्जन मिरवणुका निघणार असून या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, म्हणून ठाणे पोलिसांनी अनेक मार्गांमध्ये हे बदल केले आहेत.
यामध्ये शहरातील विसर्जन घाटांच्या दिशेने जाणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद केले असून त्यावर पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल या अत्यावश्यक वाहनांसह गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेणाºया वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच या मार्गावरील अन्य वाहनांना पर्यायी मार्गे वळवण्यात आले आहे. तसेच शहरातील मोठ्या वाहनांच्या मार्गातही बदल केले आहेत. मार्गातील हे बदल नागरिकांनाही कळवण्यात येत आहेत. तसेच या बदलांमुळे त्यांची कोणतीही अडचण होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे.
अवजड वाहनांच्या मार्गात बदल...
नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहने टीएमटी, एनएमएमटी आदी बसेसला विटावा येथे प्रवेश बंद आहे. ही वाहने ऐरोली, मुलुंड, आनंदनगर चेकनाकामार्गे ठाण्यात वळवण्यात येतील. टीएमटी, एनएनएमटी तसेच खासगी बस विटावा येथूनच प्रवाशांची वाहतूक करणार आहेत. कळवा खाडीपूलमार्गे नवी मुंबईच्या दिशेने जाणाºया अवजड वाहनांना शहरातील गोल्डन डाइजनाका आणि बाळकुमनाका येथे प्रवेश बंद असून या वाहनांना पूर्व द्रुतगती राष्टÑीय महामार्गावरून नवी मुंबईमध्ये सोडण्यात येणार आहे. तसेच खारेगाव टोलनाकामार्गे नवी मुंबईच्या दिशेने जाणाºया अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद आहे. ही वाहनेही पूर्व द्रुतगतीमार्गे नवी मुंबई शहरात सोडली जाणार आहेत. याशिवाय, पनवेल तसेच कल्याण येथून ठाण्याच्या दिशेने येणाºया मोठ्या वाहनांना शीळफाटा येथे प्रवेश बंद आहे. घोडबंदर येथील गायमुख येथील जकातनाका भागात ठाण्याच्या दिशेने येणाºया मोठ्या वाहनांनाही प्रवेश बंद असून ती चिंचोटीनाका-भिवंडी अंजूरफाटा- अंजूर चौक-मानकोलीमार्गे ठाण्याकडे जातील.
तलाव परिसरातील बदल...
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मासुंदा तलाव येथील विसर्जन घाटावर मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या घाटाकडे जाणारे मार्गही बंद केले असून या भागातील पर्यायी रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात येणार आहे. रायलादेवी तलावाकडे जाणाºया मॉडेला चेकनाका येथूनच टीएमटीसह अन्य वाहनांना प्रवेश बंद केला आहे. या मार्गावरील वाहने सिंधुदुर्ग हॉटेल-जगदाळे ट्रान्सपोर्ट, शांताराम चव्हाण मार्ग एमआयडीसी येथून वागळे परिसरात वळवण्यात येतील. कोपरी भागातील रस्ते अरु ंद असल्यामुळे सर्व परिवहनसेवेच्या बससह अन्य वाहनांना कोपरी सर्कलजवळ प्रवेश बंद केला आहे. येथूनच ही वाहने प्रवासी वाहतूक करतील. असे असले तरी उपवन तलाव परिसरातील मार्गांवर मात्र वाहतूक बदल करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली.