ठाणे महापालिकेला मिळाले २०० रेमडेसिविर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:41 AM2021-04-22T04:41:11+5:302021-04-22T04:41:11+5:30
ठाणे : काही दिवसांपासून ठाण्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत होता. पण, आता ठाणे महापालिकेकडे उपलब्ध असलेला सगळाच साठा ...
ठाणे : काही दिवसांपासून ठाण्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत होता. पण, आता ठाणे महापालिकेकडे उपलब्ध असलेला सगळाच साठा संपला असल्याची धक्कादायक माहिती उघड आली होती. आता एक दिवस पुरेल म्हणजे सुमारे २०० च्या आसपास रेमडेसिविर पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयाला मिळाले असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. रोज असा साठा उपलब्ध होईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपासून ठाण्यासह राज्याच्या विविध भागांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाइकांना हे इंजेक्शन आणण्यासाठी सांगितले जात आहे. दुसरीकडे, ठाणे महापालिकेकडे सोमवारी केवळ २०० रेमडेसिविर शिल्लक राहिले होते. १८ एप्रिलपर्यंत उपलब्ध साठा मिळेल अशी आशा पालिकेला वाटत होती. पालिकेची ही आशा फोल ठरली आणि मंगळवारी सर्वच साठा संपुष्टात आल्याची माहिती उघड झाली. पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात एकही रेमडेसिविर नसल्याची माहिती पालिकेने दिली होती. येथे सध्या ९५० रुग्णांवर उपचार सुरू असून साठा संपल्याने आता पुढे काय करायचे? असा पेच पालिकेपुढे निर्माण झाला होता. आता २०० च्या आसपास रेमडेसिविर उपलब्ध झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. येथे रोज ५०० च्या आसपास आवश्यक असल्याचेही पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हा साठा तुटपुंजा ठरणार असल्याचे दिसत आहे. रोजच्या रोज साठा उपलब्ध होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. असे असले तरी दुसरीकडे ठाण्यातील खाजगी रुग्णालयांना अद्याप रेमडेसिविरचा साठा मिळालेला नाही. काही खाजगी रुग्णालये आजही रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविरसाठी पत्र देत असून रुग्णांचे नातेवाईक ते मिळवण्यासाठी धावपळ करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातही रोज साठा येत असला तरी मागणी अधिकची असल्याने ती पूर्ण करताना त्यांचीही दमछाक होत आहे.