Thane Corporation Eknath Shinde: शिवसेनेला मोठं खिंडार! ठाण्याचे ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 11:22 AM2022-07-07T11:22:15+5:302022-07-07T11:24:25+5:30
ठाण्यात एकहाती वर्चस्व असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आता शिवसेनेला धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे-
ठाण्यात एकहाती वर्चस्व असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आता शिवसेनेला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पण काल संध्याकाळी ठाणे पालिकेतील तब्बल ६६ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत असल्याचं सांगत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.
ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतरच ठाणे महापालिकेत शिवसेनेला मोठं खिंडार पडणार याची कुणकुण होतीच. अखेर काल संध्याकाळी नरेश म्हस्के यांच्यासोबत शिवसेनेच्या ६६ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आता आगामी महापालिका निवडणुकीआधीच ठाण्यातील ६६ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने शिवसेनेपुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेला पु्न्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.
शिवसेनेला मोठं खिंडार! ठाण्यात तब्बल ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट#EknathShindepic.twitter.com/b9gM7W5pRg
— Lokmat (@lokmat) July 7, 2022
ठाणे महापालिकेत शिवसेनेचे 67 नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे 34, भाजपकडे 23, काँग्रेसकडे 3 आणि एमआयएमकडे 2 नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेचा कार्यकाळ संपला असून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात ठाणे महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.