ठाणे पालिकेची तीन पुलांवर १३ कोटी रुपयांची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:56 PM2021-03-11T23:56:03+5:302021-03-12T00:00:06+5:30

कामे थांबवण्याची भाजपची मागणी

Thane Municipal Corporation wastes Rs. 13 crore on three bridges | ठाणे पालिकेची तीन पुलांवर १३ कोटी रुपयांची उधळपट्टी

ठाणे पालिकेची तीन पुलांवर १३ कोटी रुपयांची उधळपट्टी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोडबंदर भागात मेट्रोची कामे सुरू असून तेथील पादचारी पूल काढण्याचे प्रयोजन आहे. परंतु, असे असतानाही या भागात दोन आणि कॅडबरी सिंघानिया शाळेजवळ एक असे तीन पादचारी पूल उभारण्यात येत आहेत. मुळात आधीच्याच पादचारी पुलांचा वापर होत नसताना पुन्हा १३ कोटींचा खर्च करण्याच्या निर्णय सत्ताधारी शिवसेनेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. 

ठामपाने यापूर्वी देखील घोडबंदरला विद्यापीठ, आर मॉल तसेच विवियाना मॉल, आनंदनगर टोलनाका आदींसह इतर ठिकाणीही पादचारी पूल उभारले आहेत. परंतु त्यांचा वापर अगदी नगण्य  आहे. केवळ तेथील मॉलसाठीच ते उभारल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. त्यात आता सिंघानिया शाळेजवळही ३.७४ कोटींचा खर्च करून पादचारी पूल उभारण्यात येत आहे. याचे भूमिपूजन नुकतेच महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाले आहे. तर घोडबंदरच्या कारमेल आणि पंचामृत या भागातही नऊ कोटी खर्चून दोन पादचारी पूल उभारण्याचा घाट घातला जात आहे. आधीच्याच पुलांवर केलेला खर्च हा वाया गेलेला आहे. त्याचा वापर होत नाही. त्यातही घोडबंदर भागातील सध्याचे पूल हलविण्याचे प्रयोजन असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पूल काढून दुसरीकडे पुन्हा बसविता येतात, असा दावा यापूर्वी प्रशासनाने केला आहे. त्यामुळे तेच काढून नव्याने प्रयोजन करण्यात येत असलेल्या पादचारी पुलांच्या ठिकाणी बसवावेत, जेणे करून पालिकेच्या खर्चातही बचत होईल, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. कोरोनामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ही उधळपट्टी बंद करावी अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

प्रशासनाला हाताशी धरून सत्ताधारी शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून या माध्यमातून फंड गोळा करीत  आहे.  
- मनोहर डुंबरे, गटनेते, भाजप, ठामपा

Web Title: Thane Municipal Corporation wastes Rs. 13 crore on three bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.