नारीशक्ती जिंदाबाद; ठाणे महापालिकेत पुरुष नगरसेवकांपेक्षा जास्त असणार 'नगरसेविका'?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 09:43 AM2022-05-21T09:43:48+5:302022-05-21T09:44:19+5:30

ठाणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली.

thane municipal corporation will have more corporators than male corporators | नारीशक्ती जिंदाबाद; ठाणे महापालिकेत पुरुष नगरसेवकांपेक्षा जास्त असणार 'नगरसेविका'?

नारीशक्ती जिंदाबाद; ठाणे महापालिकेत पुरुष नगरसेवकांपेक्षा जास्त असणार 'नगरसेविका'?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे  : ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या गॅजेटमध्ये पालिकेवर ७१ महिला आणि ७१ पुरुष उमेदवार निवडून जाणार आहेत; मात्र अनुसूचित जमाती(एसटी)च्या आरक्षणात तीन पैकी दोन जागा जर महिलांना गेल्या तर एक महिला अधिकची पालिकेवर जाण्याची शक्यता आहे; परंतु जर या ठिकाणी दोन पुरुषांचे आरक्षण पडले तर एक महिला पालिकेवर कमी जाणार आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे की, पुरुष सदस्यांच्या बरोबरीने महिला यावेळी सभागृहात दिसणार आहेत. 

ठाणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. आता पालिकेने निवडणुकीचे पुढील गणित आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली. शहराची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ आहे. महापालिकेवर १४२ नगरसेवक निवडून जाणार आहेत. प्रभागांची एकूण संख्या ४७ आहे. यातील ४६ प्रभाग हे तीन सदस्यांचे असून, एक प्रभाग हा चार सदस्यांचा असणार आहे. तीन सदस्यांच्या एका प्रभागाची लोकसंख्या ही किमान ३८ हजार ९०५ तर कमाल ४२ हजार ७९६ एवढी आहे. चार सदस्यांच्या एक प्रभागातील लोकसंख्या ५१ हजार ८७३ आहे. लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती (एससी) सर्वाधिक टक्केवारी असलेल्या १० प्रभागांमध्ये आरक्षण लागू केले जाणार आहे. 
अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४२ हजार ६९८ इतकी असून, त्यांच्यासाठी तीन प्रभाग राखीव असतील. त्यातले दोन महिलांसाठी ठेवले जाणार आहेत. २०११ च्या लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीची (एससी) लोकसंख्या १ लाख २६ हजार होती. त्यांच्यासाठी १४२ पैकी १० जागा आरक्षित ठेवल्या जाणार आहेत. त्यापैकी पाच जागा या महिलांसाठी असतील. निवडणूक आयोगाने प्रत्येक प्रभागातील एससी मतदारांची संख्या जाहीर केली आहे.

प्रभाग रचनेनंतर आता आरक्षणाचा घोर

महापालिकेतील सत्तेत सहभागी होण्यासाठी ५० टक्के वाटा हा महिलांचा असणार आहे. मागील निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग असल्याने दोन पुरुष आणि दोन महिला असे आरक्षण लागू होते. त्यामुळे अनेकांना संधी उपलब्ध झाली होती. आता पालिकेवर १४२ नगरसेवक निवडून जाणार आहेत. परंतु तीन सदस्यीय पद्धत असल्याने तिकीट कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे.

प्रभाग रचनेत अनेक वॉर्डांची मोडतोड करण्यात आली आहे. वॉर्ड फोडल्याने काही विद्यमान नगरसेवकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तीन सदस्यीय पद्धत असल्याने दोन महिलांचे आरक्षण पडल्यास एका पुरुषाला माघार घ्यावी लागणार आहे. त्याला आपल्या पत्नीला रिंगणात उतरवावे लागणार आहे. त्यामुळे आपल्या वॉर्डात एकाच महिलेचे आरक्षण पडो, अशी अनेकांची इच्छा आहे.

Web Title: thane municipal corporation will have more corporators than male corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.