ठाणे महापालिका करणार रुग्ण कल्याण समितीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:52 PM2018-01-17T17:52:44+5:302018-01-17T17:55:36+5:30
ठाणे महापालिका आता रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने, रुग्ण कल्याण समितीची स्थापना करणार आहे. या संदर्भात प्रस्ताव येत्या शुक्रवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
ठाणे - राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत ठाणे महापालिका देखील आता रुग्ण कल्याण समिती स्थापन करणार आहे. त्यानुसार या समितीवर सदस्यांची नावे निर्देशीत करण्यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान राबविण्यात येत असून त्या संदर्भातील प्रशासकीय व वित्तीय ठराव मंजुर झाला आहे. तसेच या कार्यक्रमाची रुपरेषा महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने यापूर्वीच शासनाकडे सादर करण्यात आली आहे. या अभियानाची अमंलबजावणी करण्यासाठी २०१७-१८ या वर्षासाठी शासनाकडून प्रकल्प अमंलबजावणी आराखडा मंजुर करण्यात आला आहे. या अभियानाअंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र स्तरावर केंद्र शासनाच्या सुचनेनुसार रुग्ण कल्याण समितीची स्थापना करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या समितीच्या माध्यमातून नागरी भागातील जनतेला आरोग्य विषयीच्या सेवा सुविधा उपलब्ध करुन देणे हा या समितीचा मुख्य उद्देश असणार आहे. या समितीच्या माध्यमातून लोकसहभाग वाढविण्यास, आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यास तसेच रुग्णालयीन स्वच्छता राखण्यास मदत होते. त्यानुसार राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान स्तरावर रुग्ण कल्याण समितीची धर्मादाय आयुक्त अंतर्गत सोसायटी रजिस्टर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र समितीमध्ये अध्यक्ष, चार सदस्य, सदस्य सचिव यांची नेमणूक केली जाणार आहे. तर नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र कार्यकारी समितीमध्ये देखील अध्यक्ष, चार सदस्य आणि एका सदस्य सचिवाची नेमणूक केली जाणार आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.