ठाणे महापालिकेत ३९ नगरसेवक हिस्ट्रीशिटर
By admin | Published: February 27, 2017 03:27 AM2017-02-27T03:27:55+5:302017-02-27T04:26:04+5:30
महानगरपालिका निवडणुकीत ठाणेकरांनी तब्बल ३९ गुन्हेगारांना पुन्हा पालिकेत धाडले
ठाणे : महानगरपालिका निवडणुकीत ठाणेकरांनी तब्बल ३९ गुन्हेगारांना पुन्हा पालिकेत धाडले असून ८८ व्यावासायिक, नोकरी करणारे ३ आणि ४४ गृहीणांनादेखील पालिकेत बसण्याचा मान मिळाला आहे. त्यातही ४० ते ५० वयोगटातील सर्वाधिक ६४ नगरसेवक दाखल झाले असून ज्येष्ठ नगरसेवकाचा मान भाजपाच्या अशोक राऊळ यांना मिळाला आहे. तर ८२ कोट्यधीश नगरसेवकही सभागृहात बसणार आहेत.
२४ नगरसेवक हे पदवी संपादन केलेले असून बारावीपर्यंत शिक्षण झालेले २६ आणि १० वीपर्यंत शिक्षण घेतलेले २१ नगरसेवक निवडून आले आहेत. तर चवथी ते नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या ४५ नगरसेवकांनी पालिकेची पायरी चढली आहे. उमेदवार न आवडल्याने तब्बल ८१ हजार ठाणेकरांनी ‘नोटा’ला पसंती दिली. असे असले तरी ठाणेकरांनी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे नगरसेवकदेखील पुन्हा निवडून दिले आहेत. पालिका निवडणुकीत ८०५ उमेदवारांपैकी वेगवेगळ्या स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेले १३१ उमेदवार मैदानात उतरले होते. त्यातील ३९ निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेनेचे २०, राष्ट्रवादीचे १२, भाजपाचे ६ आणि काँग्रेसच्या १ नगरसेवकाचा समावेश आहे. तर तरुण उमेदवारांना पसंती मिळेल अशी आशा या निवडणुकीत होती. परंतु तरुण नगरसेवकांचे प्रमाण हे १४ एवढेच असून यामध्ये २१ वर्षाच्या तरुण नगरेसेविकेचा मान हा प्रभाग क्रमांक २४ ब मधील प्रियंका पाटील यांना मिळाला आहे. तर ज्येष्ठ नगरसेवकाचा मान हा प्रभाग क्रमांक १२ ब चे नगरसेवक अशोक राऊळ यांना मिळाला आहे. २१ ते ३० वयोगटातील १४, ३१ ते ४० मधील ३१, ४० ते ५० मधील ६४, ५० ते ६० मधील २० आणि ६० वयोगटापुढील २ नगरसेवक पालिकेत निवडून गेले आहेत.
नवनियुक्त नगरसेवकांपैकी ७५ टक्के नगरसेवक हे व्यावसायिक असल्याने सत्तेच्या चाव्या यंदा त्यांच्याच हातात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेच्या ६७ पैकी ५५ नगरसेवक हे व्यावसायिक असून राष्ट्रवादीचे १८, भाजपाचे १३ आणि कॉंग्रेस आणि अपक्ष असा प्रत्येकी १ नगरसेवक हा व्यावसायिक आहे. यामध्येही ८८ व्यावसायिक, २ शेती व्यवसाय, ३ नोकरी आणि ४४ गृहीणी आहेत. महापालिकेत उच्च शिक्षितांचे प्रमाण कमी असले तरी किमान वाचता लिहिता येईल असे नगरसेवक ठाणेकरांनी महापालिकेत धाडले आहेत. यामध्ये चवथी ते नववीपर्यंत शिक्षण घेतलेले ४५, दहावी उत्तीर्ण २१, बारावी उत्तीर्ण २६, पदवीपेक्षा कमी ०३, पदवीधर २४, पदव्युत्तर पदवीप्राप्त ०३, टेक्निकल शिक्षण घेतलेले ०३, इंजिनिअर ०१ आणि काहीच शिक्षण नसलेले १ असे नगरसेवक पालिकेत निवडून आले आहेत. (प्रतिनिधी)