ठाणे महापालिकेचा 4 लाख उच्चांकी लसीकरणाचा टप्पा पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 09:35 PM2021-06-09T21:35:38+5:302021-06-09T21:36:05+5:30
महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांची माहिती
ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे महापालिकेने आज 4,02,408 उच्चांकी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण पार केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोवक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार टप्या टप्प्याने देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना, फ्रंटलाईन वर्कर्स, 45 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 18 ते 44 वयोगट, नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे. आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर 23,887 आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहिला तर 15,569 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंट लाइन कर्मचारी पैकी 26,376 लाभार्थ्यांना पहिला व 12,950 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला असून 45 ते 60 वयोगटातंर्गत लाभार्थ्यांना 1,15,056 पहिला तर 22,262 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 60 वर्षावरील नागरिकांमध्ये 1,19, 338 लाभार्थ्यांना पहिला डोस व 50, 659 लाभार्थ्यांना दुसरा डोस तसेच 18 वर्षावरील नागरिकांमध्ये 15,331 लाभार्थ्यांना पहिला डोस व लाभार्थ्यांना 940 दुसरा डोस देण्यात आला आहे.