राजन विचारे यांना ठाणे महापालिकेचा दणका, शिंदे-ठाकरे वाद उफाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 02:11 PM2022-09-21T14:11:43+5:302022-09-21T14:12:45+5:30

पत्नीच्या संस्थेला दिलेली वास्तू काढून घेतली

Thane Municipal Corporation's blow to Rajan Vikhare | राजन विचारे यांना ठाणे महापालिकेचा दणका, शिंदे-ठाकरे वाद उफाळला

राजन विचारे यांना ठाणे महापालिकेचा दणका, शिंदे-ठाकरे वाद उफाळला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नाममात्र दराने विविध संस्थांना दिलेल्या जागा, वास्तू परत ताब्यात घेण्यास ठाणे  महापालिकेने सुरुवात केली आहे. यापुढे या मालमत्ता संस्थांना देताना रेडिरेकनरच्या दराने भाडे आकारण्यात येणार आहे. राजकीय वरदहस्तामुळे अनेक वर्षांपासून ही कार्यवाही लटकली होती. या मोहिमेची सुरुवात ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या एका संस्थेला दिलेल्या वास्तूपासून झाली आहे. विचारे हे ठाकरे समर्थक असल्यामुळे ही कारवाई केली का, असा सवाल शिवसैनिक करीत आहेत. याच न्यायाने इतर वास्तू ताब्यात घेणार का, असा सवालही केला जात आहे. आजवर नाममात्र दराने देण्यात आलेल्या सर्वच वास्तू टप्प्याटप्प्याने महापालिका ताब्यात घेणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यानिमित्ताने शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यात संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. 

आमदार, खासदार निधीतून शहरात समाज मंदिरे, व्यायामशाळा उभारण्याकरिता या विविध संस्थांना नाममात्र भाडेतत्त्वावर भूखंड देण्यात आले आहेत. त्यातील बहुतेक संस्थांना राजकीय वरदहस्त लाभलेला आहे. एका याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने अशा वास्तूंना रेडिरेकनरनुसार दर आकारण्याचे निर्देश काही वर्षांपूर्वी सर्व महापालिकांना दिले होते. ठाणे महापालिकेच्या महासभेत स्वारस्य अभिव्यक्ती सूचनानुसार संस्थांना देण्यात येणारी सवलत कायम असावी, असा ठराव करण्यात आला. या ठरावाला अद्याप राज्य सरकारची मंजुरी मिळालेली नाही. ठाणे पालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने सिद्धेश्वर तलाव परिसरातील निसर्ग संस्कार भवन ही तळ अधिक एकमजली वास्तू ताब्यात घेतली. त्यासोबतच कोलबाड येथील तळ अधिक एक मजली नागेश्वर हेल्थ अँण्ड स्पोर्ट्स क्लबला भाडे कराराने दिलेल्या वास्तूची मुदत संपल्याने तीही ताब्यात घेतल्याचे पालिकेने स्पष्ट केले. पालिकेने सुडबुद्धीने ही कारवाई केली असल्याचा आरोप नंदिनी यांनी केला.

नव्याने भाडेकरार करणार
आमदार व खासदार निधीतून बांधण्यात आलेले समाज मंदिर व व्यायामशाळा या वास्तू भाडेतत्त्वावर विविध संस्थांना दिल्या असून त्यांची मुदत संपलेली आहे. यासाठी नव्याने भाडेकरार करण्यासाठी स्थावर मालमत्ता विभागाकडून ईओआय काढण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त महेश आहेर यांनी दिली.

Web Title: Thane Municipal Corporation's blow to Rajan Vikhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.