ठाणे महापालिकेचे उत्पन्न 900 कोटींनी होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 02:27 AM2021-02-04T02:27:09+5:302021-02-04T02:27:14+5:30

Thane Municipal Corporation : मुंबई महापालिकेपाठोपाठ आता शुक्रवारी ठाणे महापालिकेचे २०२१ - २२चे मूळ अंदाजपत्रक सादर होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे पालिकेची आर्थिक घडी विस्कटलेली आहे.

Thane Municipal Corporation's income will be reduced by 900 crores | ठाणे महापालिकेचे उत्पन्न 900 कोटींनी होणार कमी

ठाणे महापालिकेचे उत्पन्न 900 कोटींनी होणार कमी

Next

ठाणे : मुंबई महापालिकेपाठोपाठ आता शुक्रवारी ठाणे महापालिकेचे २०२१ - २२चे मूळ अंदाजपत्रक सादर होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे पालिकेची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यामुळे महापालिकेने मोठ्या प्रकल्पांना आधीच कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे गेली दोन वर्षे केवळ फुगवलेल्या अर्थसंकल्पामुळे आकडेही फुगल्याचे दिसले होते. यंदा मात्र कोरोनामुळे आर्थिक घडीच विस्कटलेली असल्याने आणि वर्षभरावर महापालिकेची निवडणूक आल्याने करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प हा ९०० कोटींनी कमी असणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे ठाणेकरांना यंदा नवीन काही मिळणार नसले तरी उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अंतर्गत मेट्रोऐवजी एलआरटीची भेट मात्र मिळणार आहे.

गेल्या वर्षी तीन हजार ७८० कोटींचे बजेट सादर केले होते. या आकड्यात मोठी घट यंदाच्या अर्थसंकल्पात निश्चित मानली जात आहे. 
मागील काही वर्षांत मोठमोठे प्रकल्प हाती घेतल्याने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविता आलेला नाही. त्यात मागील दोन वर्षांत मोठमोठे प्रकल्प कागदावर दाखवून अर्थसंकल्पाचे आकडेही फुगवे केले होते. त्यामुळे मागील वर्षीचा अर्थसंकल्प हा फुगवा असल्याचेही दिसून आले होते. 
एकूणच मागील काही वर्षांत नको त्या प्रकल्पांवर खर्च झाल्याने महापालिकेवर आता ३५०० कोटींचे दायित्व आले आहे. त्याची सांगडही यंदाच्या अर्थसंकल्पात घालावी लागणार आहे. 

याशिवाय कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली असून, त्यातून सावरतांना महापालिकेला आताही सुधारित अंदाजपत्रकासाठी ३५० कोटी कमी पडत असल्याची माहितीही समोर आली आहे. मागील काही वर्षीच्या अर्थसंकल्पावर नजर टाकल्यास दरवर्षी किमान १० टक्के वाढ प्रस्तावित करण्यात येत असल्याचे दिसते. मात्र, यंदा हे आकडे ९०० कोटींच्या आसपास घसरण्याची शक्यता आहे. मागील वर्षी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा तीन हजार ७८० कोटींचा होता. यंदा मात्र तो २ हजार ८०० कोटींर्पयत खाली येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.  

मोठे प्रकल्प राहणार कागदावरच 
कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यामुळे यंदा मालमत्ता कर, पाणी कर, शहर विकास विभाग, अग्निशमन, घनकचरा तसेच इतर विभागांचे उत्पन्नाचे टार्गेटही कमी होणार आहे. तसेच महत्त्वाच्या प्रकल्पांना महत्त्व देताना काही दिवास्वप्न दाखविणारे प्रकल्प कागदावरच राहतील, असेही चित्र आहे. 
गेल्या काही वर्षांत विविध विकासकामांची घोषणा केली आहे. त्यापैकी काही कामांची अंमलबजावणी झाली तर काही अजूनही प्रलंबित आहेत. घोडबंदर मार्गाकरिता पर्यायी कोस्टल रोड, जलवाहतूक, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, पूर्व ठाण्यातील दुसरा सॅटिस, अंतर्गत मेट्रो प्रकल्प, विस्तारित ठाणे रेल्वेस्थानक, नवीन ठाणे, क्लस्टर योजना, कॅन्सर हॉस्पिटल, उथळसर येथील संजीवनी तलाव पुनजीर्वित करणे, तीनहातनाका, कॅडबरी जंक्शन येथील वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी तेथे तिसरा उड्डाणपूल आदी प्रकल्प राबविण्याचे वचन त्यांनी ठाणेकरांना दिले होते.  
त्यातील बरेच प्रकल्प अद्याप कागदावरच असून, यंदाही ते कागदावरच राहतील अशी शक्यता आहे. दुसरीकडे अंतर्गत मेट्रोऐवजी आता पुन्हा एलआरटीचा पर्याय पुढे आल्याने त्याचा यंदाच्या अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात येणार आहे.

Web Title: Thane Municipal Corporation's income will be reduced by 900 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.