ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना हवाय २५ हजार सानुग्रह अनुदान
By अजित मांडके | Published: October 3, 2022 07:10 PM2022-10-03T19:10:35+5:302022-10-03T19:11:27+5:30
ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायस्वरूपी कर्मचारी असून कंत्नाटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या अडीज हजारांच्या घरात आहे.
ठाणे- मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे. मात्र ठाणे महापालिकेने अद्यापही कर्मचाऱ्यांना ते जाहीर केलेले नाही. ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी म्युनिसिपल लेबर युनियनने ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. सोमवारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत कंत्रटी कामगारांना देखील एक महिन्याचे वेतन हे सानुग्रह अनुदान म्हणून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायस्वरूपी कर्मचारी असून कंत्नाटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या अडीज हजारांच्या घरात आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधीच सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी युनियनने केली आहे.
मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली झाली असल्याने कर्मचाऱ्यांना २५ हजार सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी युनियनचे अध्यक्ष रवी राव यांनी केली आहे. तसेच पुढील तीन वर्षासाठी सानुग्रह अनुदानात प्रत्येकी २५ टक्के वाढ करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेच्या सेवेत विविध विभागात कंत्रटी स्वरुपात कामगार काम करीत आहेत. त्यांना देखील सानुग्रह अनुदान म्हणून एक महिन्यांचे वेतन द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारली असली तरी देखील महापालिकेवर आता कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा भार पडला आहे. त्यातही पालिकेचा आस्थापनेवरील खर्च हा सध्या ४२ टक्यांवर आहे, जो ३५ टक्यांच्या आत असणो अपेक्षित आहे. त्यामुळे या सर्वाचा विचार करुन पालिका सानुग्रह अनुदान जाहीर करणार असल्याचेच बोलले जात आहे. मात्र मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणोच ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली जाईल असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.