ठामपा रुग्णालयाच्या मीटर बॉक्सला आग; सुदैवाने ३ महिलांसह ३ बालके बचावले
By अजित मांडके | Published: July 19, 2023 09:39 AM2023-07-19T09:39:50+5:302023-07-19T09:40:00+5:30
शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
ठाणे - कासारवडवली येथील ठाणे महापालिका रुग्णालयातील महावितरणच्या मीटर बॉक्स रूममध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना बुधवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून यावेळी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या प्रस्तुतीगृहमध्ये तीन महिलांसह तीन बालके होती. त्यांना तातडीने हलविले असून ते सुखरूप आहेत. सुदैवाने ही आग एकाच मीटर बॉक्सला लागली होती. ती पसरली नसल्याने अन्य मीटर बॉक्सचे नुकसान झाले नाही.
घोडबंदर रोड,कासारवडवली येथील रोझा गार्डेनिया येथे तळ अधिक तीन मजली इमारतीत ठामपा रुग्णालय आहे. याच रुग्णालयाच्या तळ मजल्यावर असलेल्या मीटर बॉक्स रूममध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठामपा सुरक्षारक्षक, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. घटनास्थळी दाखल होताच महावितरण विद्युत कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडीत केल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना मीटर बॉक्स रूम मध्ये लागलेल्या आगीवर सुमारे अर्ध्यातासात नियंत्रण मिळविण्यात यश आले. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
असे आहे रुग्णालय
तळ मजल्यावर ओपीडी असून त्यावेळी कोणीही रुग्ण नव्हते. त्याचप्रमाणे दुसरा मजला रिकामी असून तिसरा मजल्यावर डायलेसिस विभाग आहे. मात्र या घटनेच्या वेळी तेथे कोणीही रुग्ण नव्हते. पण, दुसऱ्या मजल्यावर प्रसूतिगृह असून तेथे तीन महिला व तीन बालके त्यावेळी होती. त्यांना तातडीने हलविले असून ते सुखरूप आहेत. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या अधिकाऱ्यांनी दिली.