ठाणे महापालिका हद्दीत स्वच्छ प्रभाग स्पर्धेची लगबग सुरु, पहिले बक्षीस ५० लाखांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 04:14 PM2018-03-12T16:14:53+5:302018-03-12T16:14:53+5:30
ठाणे महापालिका हद्दीत आता येत्या दोन ते तीन दिवसात स्वच्छ प्रभाग स्पर्धा सुरु होणार आहे. यासाठी ठाणे महापालिकेने त्रयस्त समितीची नेमणूक केली आहे. जो या स्पर्धेत बाजी मारेल त्याला पहिले बक्षीस ५० लाखांचे दीले जाणार आहे.
ठाणे - राज्य शासनाने जारी केलेल्या एका आध्यादेशानुसार ठाणे महापालिकेने आता स्वच्छ प्रभाग स्पर्धा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, जो प्रभाग या स्पर्धेत बाजी मारेल त्याला ५० लाखांचे पहिले बक्षीस दिले जाणार आहे. यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाने एक त्रयस्त समिती नेमली असून या समितीच्या माध्यमातून ही स्पर्धा घेतली जाणार आहे. यासाठी नगरसेवकांना देखील जागरुक केले जाणार आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियनाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. या अभियानाअंतर्गत राज्यातील प्रत्येक शहरात कचरा लाख मोलाचा या अंतर्गत निर्मितीच्या जागी कचऱ्याचे वर्गीकरण (ओला व सुका) करुन या वर्गीकरणाकृत केलेल्या कचऱ्यावर केंद्रीत अथवा विकेंद्रीत पध्दतीने प्रक्रिया करण्याबाबत सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सुचना देण्यात आल्या असून त्यानुसार आता त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांअतर्गत स्पर्धा घेण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार उशिराने का होईना ठाणे महापालिकेने देखील या स्पर्धेत भाग घेतला आहे. ही स्पर्धा प्रत्येक प्रभागात घेतली जाणार आहे. स्वच्छ प्रभाग ठेवणे, घरोगरी जाऊन कचरा संकलन पध्दत अवलंबिणाऱ्या घरांचे प्रमाण, १०० घरातून संकलनाची टक्केवारी यासाठी १०० गुण, एकूण निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी किती टक्के कचऱ्याचे ओला व सुका कचरा या स्वरुपात वर्गीकरण केले जाते यासाठी ४०० गुण, वार्डमध्येच ओल्या कचऱ्यावर विकेंद्रीत पध्दतीने प्रक्रिया केली जाते, यासाठी १००, वार्डातील नेहमी कचरा दिसणाऱ्या ठिकाणांचे सुशोभिकरण यासाठी ५०, वार्डमधील सर्व घरांमध्ये १०० टक्के वैयक्ति शौचालयांचे प्रमाण १००, वैयक्तीक सामुदायिक शौचालयांचे प्रमाण ५० टक्के, नगरसेवकांनी स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ विषयी जनजागृतीचे कार्यक्रम घेतले आहेत यासाठी ४०० गुण, वार्डात १०० टक्के मालमता कर संकलन करण्यात आलेले आहे का? यासाठी ५० गुण, वॉर्डात प्लास्टीक बंद करण्यात आली असून राबविण्यात येत आहे ५० गुण आदींच्या स्वरुपात मार्कस दिले जाणार आहेत.
त्यानुसार आता येत्या दोन ते तीन दिवसात ही स्पर्धा त्रयस्त समितीच्या माध्यमातून सुरु होणार आहे. नगरसेवकांना देखील या विषयीची माहिती दिली जाणार आहे. ज्या वॉर्डांना या स्पर्धेत अधिक गुण मिळतील त्यांची प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी निवड केली जाणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी ५० लाख, द्वितीयसाठी ३५ आणि तृतीय क्रमांकासाठी २० लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. परंतु यातून ज्या प्रभागांचे क्रमांक लागणार आहेत. त्यांचा अहवाल हा शासनाकडे पाठविला जाणार आहे. शासनाकडून पुन्हा याची माहिती घेतली जाणार असून त्यानंतरच निकाल दिला जाणार आहे.