फेरिवाल्याच्या हल्ल्यातील जखमी महापालिका अधिकारी कल्पिता पिपंळेंना रुग्णालयातून डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 07:32 PM2021-09-07T19:32:12+5:302021-09-07T19:32:30+5:30
मागील सोमवारी कल्पिता पिंपळे या आपल्या पथकासह घोडबंदर भागातील कासारवडवली नाक्यावर असलेल्या अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या.
ठाणे : मागील सोमवारी फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांची दोन बोटे तुटली होती. त्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होती. त्यानंतर आठ दिवसांनी त्यांना डिसचार्ज करण्यात आले आहे.
मागील सोमवारी कल्पिता पिंपळे या आपल्या पथकासह घोडबंदर भागातील कासारवडवली नाक्यावर असलेल्या अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळेस संतप्त झालेल्या अमरजीत यादव या फेरीवाल्याने आपल्या हातातील चाकू त्यांच्यावर भिरकवला. यावेळी त्यांचे डोके यात थोडक्यात बचावले होते. परंतु त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे कापली गेली. तर त्यांचा सुरक्षा रक्षकाचेही एक बोट कापले गेले होते. त्यानंतर त्याच दिवशी त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांची तुटलेली बोटे मिळवून ती जोडण्यासाठी दोन वेळा शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या. परंतु त्यांच्या या दोनही शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या नाहीत. परंतु त्यांच्या बोटाचे जॉईन्ट जिवंत असल्याने भविष्यात कृत्रिम बोटे लावून त्याची हालचाली होऊ शकणार आहे. दरम्यान मंगळवारी सांयकाळी त्यांना रुग्णालयातून डिसाचर्ज देण्यात आला आहे.