ऊर्जा संवर्धनासाठी ठामपाला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:22 AM2017-07-27T00:22:48+5:302017-07-27T00:22:49+5:30
ऊर्जा संवर्धन आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात ठाणे महापालिकेने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दोन राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारांनी राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणा’च्या वतीने ठामपाचा सन्मान करण्यात आला.
ठाणे : ऊर्जा संवर्धन आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात ठाणे महापालिकेने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दोन राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारांनी राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणा’च्या वतीने ठामपाचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या अभिकरणाच्या वतीने अलीकडेच पुणे येथे झालेल्या एका समारंभामध्ये राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विद्युत विभागाचे उपनगर अभियंता सुनील पोटे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. या वेळी बावनकुळे यांनी ठाणे महानगरपालिका करत असलेल्या कामाचा विशेष गौरवपूर्ण उल्लेख केला. ठामपाने ऊर्जा कार्यक्षमता व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. महापालिका इमारतींवर स्टार लेबलिंग, ऊर्जा कार्यक्षमता, सौरऊर्जा नेट मीटरिंग, पथदिव्यांसाठी ऊर्जा कार्यक्षमता प्रकल्प, टायडल एनर्जी, मायक्रो जलविद्युत प्रकल्प, सौरऊर्जेवर वीजनिर्मिती, इलेक्ट्रीक बसेस आदी महत्त्वाचे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. शिवाय, महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे विविध सेवांसाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर सुरू केला आहे.