काळ्याबाजाराकडे ठाणे पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:47 AM2021-04-22T00:47:31+5:302021-04-22T00:47:47+5:30

रेमडेसिविरबाबत महापौरांचा संताप : प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचे वाभाडे

Thane Municipality neglects black market | काळ्याबाजाराकडे ठाणे पालिकेचे दुर्लक्ष

काळ्याबाजाराकडे ठाणे पालिकेचे दुर्लक्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : ठाण्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असताना महापालिकेच्या कोविड सेंटरमधून काही दिवसांपूर्वी त्याचा काळाबाजार करणाऱ्यास अटक केली आहे. याचा तपास ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने सुरू केला, मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाने याची साधी चौकशीही केली नसल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी झालेल्या महासभेत उघड झाली. यासंदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावून याचा तपास आरोग्य विभागाने केलाच पाहिजे असे स्पष्ट केले.


महापालिका हद्दीत सध्या रेमडेसिविरचा तुटवडा  आहे. ते इंजेक्शन मिळावे यासाठी महापालिका जास्तीची किमंत मोजण्यासही तयार झाली. पण, महापालिकेच्या कोविड सेंटरमधून त्याचा काळा बाजार केला जात असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उघड झाली. ठाणे खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई  केली. एक आराेपी ग्लोबल कोविड सेंटरमध्ये कामाला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आरोग्य विभागाकडून होणे अपेक्षित होते, अशी माहिती म्हस्के यांनी महासभेत दिली.
आराेपीला रेमडेसिविर कोण देत होते, कोणाकडून त्याने ते उचलले होते, याची माहिती आरोग्य विभागाने घेणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी या प्रकरणाकडे काहीच लक्षच दिले नसल्याचेही महासभेत उघड झाले आहे.


या प्रकरणाची चौकशी आरोग्य विभागाने केली का? असा सवालही महापाैरांनी केला. त्यावर खंडणी विरोधी पथक या प्रकरणाची चौकशी करीत असल्याने आम्ही त्याची चौकशी केली नसल्याचे  प्रभारी आरोग्य अधिकारी वैजयंती देवगीकर यांनी सांगितले. त्यामुळे महापाैर आणखीन संतप्त झाले.
महापालिकेच्या कोविड सेंटरमधून जर इंजेक्शन गायब होत असतील त्याची जबाबदारी ही आरोग्य विभागाची नाही का?, त्याचा तपास हा झालाच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकूणच या प्रकरणात आरोग्य विभागाची चूक असून ती सुधारणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. 
काही दिवसांपासून ठाण्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत होता. पण, आता ठाणे महापालिकेकडे उपलब्ध असलेला सगळाच साठा संपला असल्याची धक्कादायक माहिती उघड आली होती. दुसरीकडे ठाण्यातील खाजगी रुग्णालयांना अद्याप रेमडेसिविरचा साठा मिळालेला नाही. त्यामुळे दाखल रुग्णांवर उपचार कसे करायचे, असा पेच आहे.


दुसरीकडे, ठाणे महापालिकेकडे सोमवारी केवळ २०० रेमडेसिविर शिल्लक राहिले होते. मंगळवारी ग्लोबल रुग्णालयात एकही रेमडेसिविर नसल्याची माहिती पालिकेने दिली होती. येथे सध्या ९५० रुग्णांवर उपचार सुरू असून येथे रोज ५०० च्या आसपास आवश्यक असल्याचेही पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
१८ एप्रिलपर्यंत उपलब्ध साठा मिळेल अशी आशा पालिकेला वाटत होती. पालिकेची ही आशा फोल ठरली हाेती. जिल्हाधिकारी कार्यालयातही रोज साठा येत असला तरी मागणी अधिकची असल्याने ती पूर्ण करताना त्यांचीही दमछाक होत आहे. काही खाजगी रुग्णालये आजही रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविरसाठी पत्र देत आहेत. 

ठाणे महापालिकेला मिळाले 
200 रेमडेसिविर
ठाणे :  पालिकेकडील साठा संपल्यानंतर आता एक दिवसापुरतेच सुमारे २०० रेमडेसिविर ग्लोबल रुग्णालयाला मिळाल्याची माहिती पालिकेने दिली. रोज असा साठा उपलब्ध होईल, असेही स्पष्ट 
केले आहे.
 

Web Title: Thane Municipality neglects black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.