ठाणे पालिका : तरणतलाव थेट कंत्राटदाराकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:41 AM2019-12-23T00:41:44+5:302019-12-23T00:41:57+5:30
ठाणे पालिका : ताबा मिळण्याआधीच विकासकाने परस्पर चालवण्यास दिला
ठाणे : लोकमान्यनगर भागातील नव्याने विकसित करण्यात आलेल्या तरणतलावाचा मुद्दा गुरुवारी महासभेत पुन्हा एकदा वादग्रस्त ठरला. विकासकाने टीडीआरच्या बदल्यात हा तरणतलाव विकसित करून दिला आहे. मात्र, तलावाचा ताबा पालिकेला मिळण्याआधीच विकासकाने परस्पर दुसऱ्या ठेकेदाराला हा तलाव चालविण्यासाठी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लोकमान्यनगर भागात नव्याने तरणतलाव विकसित करण्यात आला आहे. मागील महासभेतदेखील या तलावाच्या मुद्यावरून वादंग निर्माण झालेहोते.
गुरुवारी महासभेत पुन्हा या मुद्याला भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी हात घातला. याच मुद्याला धरून शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के, राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनीदेखील प्रशासनाला जाब विचारला. तरणतलाव भाड्याने देण्याचा करारनामा कशा पद्धतीने करण्यात आला, असा सवाल मुल्ला यांनी उपस्थित केला. त्यावर शहर विकास विभागाने यासंदर्भात प्रस्ताव तयार करून तो वागळे इस्टेट विभागाला देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. त्याचे दर ठरविण्याचे, नियम, अटी आणि शर्ती ठरवण्याचे काम हे महासभेचे असताना परस्पर विकासकाला तरणतलाव चालविण्यासाठी कसा देण्यात आला, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यावरून चांगलेच वादळ पेटले होते. दुसरीकडे स्थानिक नगरसेविका परिषा सरनाईक यांनी या ठिकाणी आता मुलांना चांगली संधी मिळाली आहे. नुसता विरोध करून काही उपयोग नाही, असेही त्यांनी सांगितले.
सवाल करत प्रशसानाला धारेवर धरले
खाजगी संस्थेला या तलावाचा ठेका दिला आहे का, त्याचा प्रस्ताव महासभेत आला होता, असे अनेक सवाल करीत पुन्हा प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. तरणतलावाला विरोध नाही. मात्र, ज्या पद्धतीने प्रशासनाने काम केले ते चुकीचे असून उद्या पालिका अशा पद्धतीने सुविधा भूखंड कोणालाही देईल, त्याला जबाबदार कोण, असा सवालही यावेळी करण्यात आला. परंतु, त्यावर प्रशासनाकडून योग्य ते उत्तर देण्यात आले नाही. अखेर, उत्तर मिळत नसल्याने नगरसेवकही शांत झाले.