वृक्ष संवर्धनासाठी आता ठाणे पालिकेचे जिओ टॅग
By admin | Published: July 8, 2015 12:01 AM2015-07-08T00:01:06+5:302015-07-08T00:01:06+5:30
केवळ वृक्ष लागवडीवर लक्ष केंद्रीत न करता लावलेल्या प्रत्येक रोपट्याचे जतन होते की नाही याची माहिती मिळावी यासाठी ठाणे महापालिकेने जिओ टॅग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे : केवळ वृक्ष लागवडीवर लक्ष केंद्रीत न करता लावलेल्या प्रत्येक रोपट्याचे जतन होते की नाही याची माहिती मिळावी यासाठी ठाणे महापालिकेने जिओ टॅग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक वृक्ष या जिओ टॅगवर पाहता येणार आहे. अशा पध्दतीने जिओ टॅगवर वृक्षांची नोंद ठेवणारी ठाणे ही राज्यातील एकमेव महापालिका असेल.
ठाणे महापालिकेने ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने २ वर्षात ५ लक्ष वृक्ष लागवड करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार सध्या शहरात वृक्ष लागवडीचे काम सुरु झाले आहे. यामध्ये पालिका पहिल्या वर्षी एक लाख आणि सामाजिक संस्था दीड अशा प्रकारे अडीच लाख वृक्षांची लागवड करणार आहे. दुसऱ्या वर्षीदेखील याच पद्धतीने काम केले जाणार आहे. परंतु, आता पालिकेने वृक्ष लागवडीचे काम शासकीय संस्थेस देण्याचे निश्चित केले असून त्यानुसार सध्या पालिका काम करीत आहे.
मात्र, लावण्यात येणाऱ्या वृक्षांचे जतन, संवर्धन करण्यात यावे, लावलेल्या वृक्षांची वाढ किती झाली, ते जगले अथवा गायब झाले, त्याची माहिती या टॅगच्या माध्यमातून मिळणार आहे.
या तंत्रज्ञानामुळे वृक्षांची अद्ययावत नोंद होणार असून व वृक्ष गणनेसाठी ती अत्यंत उपयोगी ठरणार आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वृक्षाची प्रजात, त्याची उंची, वय, घेर याची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. सद्यस्थितीत आनंदनगर जकात नाका, हायवे येथे लागवड करण्यात
आलेल्या वृक्षांची नोंद प्रायोगिक तत्वावर केली असून, भविष्यात सर्व वृक्षांची नोंद जिओ टॅगिंगच्या सहाय्याने करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.