डायघरमध्ये ११ मुलांना पुरल्याच्या वृत्ताने ठाण्यात खळबळ: आरोपी तरुणीने केली पोलिसांची दिशाभूल!
By जितेंद्र कालेकर | Published: April 2, 2019 09:49 PM2019-04-02T21:49:11+5:302019-04-02T22:10:59+5:30
डायघर येथील सहारा कॉलनी डोंगराजवळ दहा ते ११ मुलांना पुरल्याचे अफरीन खान या आरोपी तरुणीने सांगितल्यानंतर पोलिसांचेही धाबे दणाणले. तीन चार तास जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुनही तिने काहीच हाती न लागल्याने या प्रकरणाचे गूढ आणखीनच वाढले आहे.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दोन वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या अफरीन खान (२०) या तरुणीला डायघर पोलिसांनी अटक केल्यानंतर तिने धक्कादायक माहिती दिली. आणखी दहा ते ११ मुलांना सहारा कॉलनी जवळील डोगरात पुरल्याचे तिने सांगितल्यानंतर पोलिसांचेही धाबे दणाणले. त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या भागात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन या प्रकाराची पोलिसांनी खातरजमा केली. प्रत्यक्षात काहीही निष्पन्न न झाल्याने अफरीन दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट झाले.
या संपूर्ण प्रकाराची आता गांर्भीर्याने दखल घेण्यात आली असून या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी लोकमत ला सांगितले. मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरुन सलमान खान या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाले होते. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागासह मुंब्रा पोलिसांनीही कसून शोध घेऊनही त्याचा अद्याप शोध लागला नाही. त्यापाठोपाठ भास्करनगर कळवा येथूनही खुशी गुप्ता या चार वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले. तिचाही शोध अद्याप लागला नाही. अफरीनला दोन वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात डायघर पोलिसांनी अटक केल्यानंतर तिच्याकडे इतर मुलांची चौकशी केली. त्यावेळी तिने एका क्षणी अशा दहा ते ११ मुलांना पुरल्याचे सांगितले. तर अचानक तिने मुलांना विकल्याचेही सांगितले. काही वेळाने तिने असे काहीच केले नसल्याचेही सांगितले. पण, तिने पहिली माहिती दिली. ती धक्कादायक असल्याने ठाण्यातील दोन ते तीन अपहरण प्रकरणांचा शोध लागण्याच्या दृष्टीने महत्वाची असल्याने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथक, न्यायवैद्यक विभागाचे अधिकारी, ठाण्याचे तहसिलदार अधिक पाटील, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर, रामचंद्र मोहिते आणि सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील आदींच्या पथकाने सहारा कॉलनी, शीळ फाटा डायघर याठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने मोठया प्रमाणात खोदकाम केले. पण, काहीच हाती न लागल्यामुळे पुन्हा अफरीनकडे पोलिसांनी विचारणा केली. तेंव्हा आपण पोलीस मारतील, या भीतीने अशी बतावणी केल्याचा तिने दावा केला. अर्थात, मुंब्रा आणि कळवा येथून बेपत्ता झालेली मुले अद्यापही मिळालेली नाहीत. त्यामुळे अफरीनकडे सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे डायघर पोलिसांनी सांगितले.