Thane: ठाण्यातून पाकिस्तानला गेलेल्या नगमाची पोलिस कोठडीत रवानगी
By अजित मांडके | Published: July 25, 2024 09:38 PM2024-07-25T21:38:10+5:302024-07-25T21:40:08+5:30
Thane News: बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार करून पाकिस्तानला गेलेल्या नगमा खान हिला वर्तक नगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. तिला २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
- अजित मांडके
ठाणे - बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार करून पाकिस्तानला गेलेल्या नगमा खान हिला वर्तक नगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. तिला २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. खानने पाकिस्तानात जाऊन गुपचूप निकाह (लग्न) करून ती पुन्हा ठाण्यात परतली होती. पोलिसांनी तिला २५ जुलै रोजी अटक केल्यानंतर ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तेंव्हा तिला दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली.
ठाण्यातील नगमा नूर मकसूद अली ऊर्फ सनम खान या २३ वर्षांच्या तरुणीने सोशल मीडियावर ओळख झालेल्या पाकिस्तानी तरुणाशी पाकिस्तानात जाऊन गुपचूप निकाह (लग्न) केला होता. तिथून ती पुन्हा ठाण्यात परतली होती. तिने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी तिच्या राहत्या घरून तिला अटक केली.
यानंतर तिला ठाणे सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने तिला शनिवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिहं जाधव यांनी दिली. नगमा हेरगिरी करण्यासाठी भारतात परत आल्याचा संशय गुप्तचर यंत्रणेसह वर्तकनगर पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, तिने नावात बदल करून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच तिच्या मुलीचा बनावट जन्म दाखला आणि आधार कार्ड ठाण्याच्या लोकमान्यनगर बस डेपोजवळील एका दुकानातील व्यक्तीकडून तयार केले. हीच कागदपत्रे आधार कार्डसोबत जोडून पारपत्र कार्यालयात तसेच वर्तकनगर पोलिस ठाण्यात दाखल केले. ही कागदपत्रे खरे असल्याचे भासवून त्याद्वारे पासपोर्ट मिळवला. त्याआधारे पाकिस्तानचा व्हिसा प्राप्त करून ती २ मे २०२३ ते १५ मे २०२४ या दरम्यान पाकिस्तानमध्ये गेली. त्यामुळे तिच्याविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात १९ जुलै २०२४ रोजी फसवणुकीसह भारतीय पासपोर्ट कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.