विठुरायाच्या गजराने दुमदुमली ठाणेनगरी
By admin | Published: July 5, 2017 06:24 AM2017-07-05T06:24:25+5:302017-07-05T06:24:25+5:30
एकीकडे पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी अलोट गर्दी केली
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकीकडे पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी अलोट गर्दी केली असताना दुसरीकडे ठाणे शहरातील पुरातन विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली. विठुरायाच्या गजराने ठाणे शहर दुमदुमून गेले होते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा नामघोष सर्वांच्या मुखी होता.
१४६५ साली स्थापन झालेले चेंदणी कोळीवाड्यातील व २०० वर्षांची परंपरा असलेल्या बाजारपेठेतील पुरातन विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्याचप्रमाणे शहरातील छोट्या भागांत असलेल्या विठ्ठल मंदिरातही जाऊन भाविकांनी दर्शन घेतले. एकादशीच्या दोन-तीन दिवस आधी शहरात विविध ठिकाणी विठ्ठलावर आधारीत भक्ती गीतांचा कार्यक्रम ऐकण्याचा अनुभव ठाणेकरांनी घेतला. जणू काही सभागृहात पंढरपूरचे वातावरण अनुभवत असल्याचे प्रत्येकाला वाटत होते. शहरातील शाळांमध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळाशाळांमध्ये आदल्या दिवशी पंढरीची वारीच अवतरली होती. या शाळांतील विद्यार्थी संतनामदेव , संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वारकरी आणि विठ्ठल -रखुमाईच्या वेषात नटून थटून उपस्थित झाले होते. चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टच्या पूर्व ठाण्यातील पुरातन श्री विठ्ठल मंदिरात सकाळपासून श्रींच्या दर्शनासाठी भक्तांची रांग लागली होती. गेली चार वर्षे या मंदिराचे पुजारी म्हणून कार्यरत असलेले योगेश पाठक व त्यांची पत्नी जयश्री पाठक यांच्या हस्ते पहाटे पूजेसह अभिषेक करण्यांत आला. आषाढी एकादशीनिमित्त सुयश कला-क्र ीडा मंडळ, ठाणे यांच्यातर्फे मंदिराला फुलांची देखणी आरास केली होती. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत नाखवा, उपाध्यक्ष भगवान कोळी, सहकार्यवाह ऋ षिकेश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.