ठाणे : आर्थिक विकास महामंडळासाठी नाथपंथी समाजाचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By सुरेश लोखंडे | Published: April 27, 2023 07:33 PM2023-04-27T19:33:46+5:302023-04-27T19:34:09+5:30
नाथपंथी समाजाच्या शिष्टमंडळाने पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांची गुरुवारी भेट घेतली.
सुरेश लोखंडे
ठाणे : स्वातंत्र्यासाठी ७५ वर्षे झाली तरीही नाथपंथी समाजाचा विकास झालेला नाही. या समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याची मागणी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिलेल्या निवेदनात भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे अध्यक्ष नितीश पवार,यांनी केली आहे.
नाथपंथी समाजाच्या शिष्टमंडळाने पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांची गुरुवारी भेट घेतली. त्यावेळी जिल्ह्यातील या समाजाची संख्या अत्यल्प असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून देत महामंडळाची मागणी लाऊन धरली. या समाजातील लोकांचा मानव विकास निर्देशांक खुप कमी आहे. लोक अद्यापही उच्चशिक्षित नाही. त्यामुळे शासनाच्या योजनांची माहिती नाही.बहुतांश लोक दारिद्रय रेषेखालील आहेत. समाजातील लोकांकडे उपजीविकेचे व उत्पन्नाची साधने नाहीत. त्यामुळे लोक पारंपरिक व्यवसाय म्हणजे भिक्षा मागणे, जागरण गोंधळ घालणे, डवर वादक तसेच भराडी घालणे इत्यादी व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिले.
सध्या वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ आहे परंतु या मध्ये एकूण २८ ते २९ जातींचा समावेश आहे. या महामंडळाला शासनाकडून निधी प्राप्त होत नाही. निधी मंजूर झाला तर तो अल्प प्रमाणात असतो. त्यामुळे या समाजातील लोकांना त्याचा लाभ होत नाही. या समाजाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे गरजेचे आहे. आमदार गणेश नाईक अधिवेशनामध्ये हा विषच चर्चेला आणल्याचे ही पवार यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.
त्यास अनुसरून नाथजोगी, नाथपंथी, डवरी गोसावी, गोंधळी,समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली या शिष्टमंडळात सोपान नलावडे, चंद्रकांत गावडे, संतोष कासार, संगिता पवार, गोरख वंजारी, शशिकांत जाधव आदींचा समावेश होता.