ठाणे, नवी मुंबईकरांचा १५ रुपयांत ‘प्रीमियम’ प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2023 06:18 PM2023-05-29T18:18:05+5:302023-05-29T18:18:21+5:30
गारेगार आणि आरामदायी प्रवासामुळे ही सुविधा प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे.
मुंबईकर प्रवाशांना दर्जेदार सेवा देणाऱ्या बेस्टची प्रीमियम बससेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. प्रीमियम सेवेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता बेस्ट उपक्रमाने नवी मुंबई, दक्षिण मुंबईतून थेट मुंबई विमानतळ अशी सेवा उपलब्ध केली आहे. त्याचबरोबर आणखी ८ मार्गांवर बससेवा दिली जाणार आहे. आणखी बेस्ट उपक्रमाने १५ ते ५० रुपयांत आपली सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईप्रमाणेच ठाणे आणि नवी मुंबईकरांच्या दिमतीलाही बेस्टच्या या प्रीमियम बस देण्यात येणार असून, गारेगार आणि आरामदायी प्रवासामुळे ही सुविधा प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे.
मुंबईकर प्रवाशांच्या सेवेसाठी दिवसरात्र धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाने १२ डिसेंबरपासून प्रीमियम लक्झरी बससेवा सुरू केली आहे. या सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक, वातानुकूलित प्रीमियम बस ठाणे ते बीकेसी, वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी या मार्गावर दररोज धावत असून, दर अर्ध्या तासाच्या अंतराने धावणाऱ्या या बसमधून दररोज ३०० हून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत.
पहिला प्रवास माफक दरात
मुंबईप्रमाणेच खारघर ते बीकेसी, बेलापूर ते बीकेसी, खारघर ते अंधेरी, बेलापूर ते अंधेरी, लोढा अमारा (ठाणे) ते अंधेरी, कुर्ला ते बीकेसी, गुंडवली ते बीकेसी आणि अंधेरी ते सिप्स या आठ मार्गांवर प्रीमियम बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन प्रवाशांना पहिला प्रवास माफक दरात म्हणजेच १५, २५, ४५ आणि ५० रुपयांमध्ये करता येणार आहे.
ही आहेत प्रीमियम वैशिष्ट्ये
- ‘बेस्ट’च्या ‘चलो मोबाईल’ ॲपद्वारे या बसमधील आसन आरक्षित करता येते.
- या बस दर ३० मिनिटांनी धावत असून, बसमध्ये आरामदायी सिट्स आहेत.
- याशिवाय जेवढी आसने तितकेच प्रवासी बसमधून प्रवास करू शकतात.
- वातानुकूलित बसमध्ये प्रवाशांना चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.