Thane: दिल्लीतील शेतकरी माेर्चाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे धरणे आंदोलन
By सुरेश लोखंडे | Published: February 20, 2024 03:08 PM2024-02-20T15:08:03+5:302024-02-20T15:08:53+5:30
Thane News: ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंजाब, हरयाणा येथील हजाराे शेतकऱ्यांनी एमएसपीच्या मागणीसाठी संसदेवर काढलेल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी धरणे आंदाेलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे - येथील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंजाब, हरयाणा येथील हजाराे शेतकऱ्यांनी एमएसपीच्या मागणीसाठी संसदेवर काढलेल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी धरणे आंदाेलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यावेळी या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
येथील शासकीय विश्रामगृहासमाेर या कार्यकर्त्यांनी या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे धरणे आंदाेलन छेडले. या आंदाेलनाचे नेतृत्व या पक्षाच्या ठाणे-पालघर विभागिय महिला अध्यक्षा ऋता आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी केले. शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवून ठेवले आहे. त्यांच्यावर गोळीबार, लाठीचार्ज केला जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेस ने हे आंदाेलन छेडले. शेतीमालाच्या हमीभावासाठी कायदा बनवावा आणि स्वामिनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी लागू करण्यात याव्या या दोन प्रमुख मागण्या घेऊन उत्तरेकडील राज्यांमधील शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन संसदेवर हा माेर्चा काढला आहे.
संसदेवर माेर्चा घेऊत येत असलेल्या या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर आढवण्यासाठी केंद्र शासनाने तारांचे कुंपण टाकण्यापासून ते सिमेंट काँक्रीटचं मजबूत कुंपण उभारण्यापर्यंत उपाययोजना केल्या आहेत. आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून प्रसंगी ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्र्टवादीच्या या कार्यकत्यांनी तीव्र आंदाेलन छेडून प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदाेलनकर्त्यांनी ‘शेतकऱ्यांवर गोळीबार , आता नाही सहन होणार’, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, जगाच्या पोशिंद्याला जगू द्या आदी घाेषणांचे फलक हाती घेऊन केंद्र शासनाच्या या मनमानीचा त्यांनी निषेध केला.
या आंदाेलन महिलांनी माेठ्या संख्येने सहभाग घेतल्याचे निदर्शनात आले. आजच्या या आंदाेलनात येथील राष्र्टवादीचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे , युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, प्रदेश सेवादल सरचिटणीस तसबीर सिंह,प्रदेश सरचिटणीस कैलास हावळे,विद्यार्थी कार्याध्यक्ष राहु पाटील,ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी,असंघटित कामगार सेलचे राजु चापले, व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षेत्रीय,वैद्यकीय सेलचे अध्यक्ष आसद चाऊस,कार्याध्यक्ष सुभाष यादव, महेंद्र पवार, अंकुश मढवी, रचना वैद्य, एकनाथ जाधव, रोहिदास पाटील, शिवा कालूसिंह, संजीव दत्ता, विशाल खामकर, पप्पू अस्थाना, सुरेंद्र यादव, इकबाल शेख, स्वरूप सिंग, वैभव खोत, हरपाल सिंग, संतोष मोरे, कुणाल भोईर आदी कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.