गैरसमजुतीतून अपहरणाचा आरोप, तरुणीची मदतीची याचना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 04:18 AM2018-11-06T04:18:29+5:302018-11-06T04:19:15+5:30
नितीन कंपनी येथून विवियाना मॉलकडे रविवारी पहाटेच्या सुमारास रिक्षाने जात असताना चालक आपले अपहरण करत असल्याचा गैरसमज एका २२ वर्षीय तरुणीचा झाला.
ठाणे - नितीन कंपनी येथून विवियाना मॉलकडे रविवारी पहाटेच्या सुमारास रिक्षाने जात असताना चालक आपले अपहरण करत असल्याचा गैरसमज एका २२ वर्षीय तरुणीचा झाला. या तरुणीस विवियाना मॉलकडे जायचे होते. कोरम मॉलसमोरून गेल्यानंतर तोच विवियाना मॉल आहे, असा तिचा समज झाला. याच गैरसमजुतीमुळे रिक्षाचालकावर संशय घेत तिने मदतीची याचना केल्याची माहिती चौकशीत उघड झाली.
रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास ही तरुणी तिच्या एका मित्राला भेटण्यासाठी विवियाना मॉलकडे जाण्यासाठी नितीन कंपनी येथून संतोष सकट यांच्या रिक्षामध्ये बसली. रिक्षाने कोरम मॉल ओलांडल्यानंतर तिने आरडाओरडा करत रिक्षा थांबवण्यास सांगितले. हा प्रकार तिथून जाणाऱ्या हवालदार ज्ञानेश्वर शिरसाठ यांच्या निदर्शनास आला. त्यांनी पोलिसांच्या चॅनलवरून नियंत्रण कक्षाकडे ही माहिती दिली.
त्यानंतर, घटनास्थळी राबोडी, वर्तकनगर आणि नौपाडा या तीन पोलीस ठाण्यांचे बीटमार्शल आले. तिला नौपाडा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले. त्यावेळी हा प्रकार वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. वागळे इस्टेट पोलिसांनी रिक्षाचालकासह तिची चौकशी केली. तिला विवियाना मॉलकडे जायचे होते. तिच्याकडे रिक्षाचेही पैसे नव्हते. तिचा मित्रच पैसे देणार असल्यामुळे विवियाना मॉलकडे तिला घेऊन जात होतो. पण, तिने अचानक आरडाओरडा केला. तिच्या अपहरणाचा किंवा इतर कोणताही उद्देश नसल्याचे या रिक्षाचालकाने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, या तरुणीची रिक्षाचालकाविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी सांगितले. भल्या पहाटे अघटित होऊ नये, म्हणून वाहतूक शाखेच्या शिरसाठ यांनी तातडीने या तरुणीच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर राबोडी, वर्तकनगर आणि नौपाडा पोलिसांचे बीटमार्शलही त्याठिकाणी मदतीसाठी आले. परंतु, नंतर या रिक्षाचालकाबाबत तिचा गैरसमज दूर झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, या मुलीला सुरक्षारक्षक असलेल्या तिच्या वडिलांच्या ताब्यात दिल्याचेही पठाण यांनी सांगितले.