Thane: दाेन वर्षांत भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा काेणी आणू शकले नाही, एकनाथ शिंदे यांचा टोला
By जितेंद्र कालेकर | Published: July 21, 2024 10:32 PM2024-07-21T22:32:10+5:302024-07-21T22:34:44+5:30
Thane News: गेल्या दाेन वर्षांत भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा सरकारवर काेणी आणू शकलेले नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे सरकारमध्ये राहिलेली महाविकास आघाडी ज्या पद्धतीने आराेप करीत आहेत, ते निराधार असल्याची स्पष्टाेक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - गेल्या दाेन वर्षांत भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा सरकारवर काेणी आणू शकलेले नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे सरकारमध्ये राहिलेली महाविकास आघाडी ज्या पद्धतीने आराेप करीत आहेत, ते निराधार असल्याची स्पष्टाेक्ती मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली.
ठाण्यातील टेंभी नाक्यावर गुरुपौर्णिमेनिमित्त दिवंगत आनंद दिघे यांना ते अभिवादन करण्यासाठी रविवारी सायंकाळी आले हाेते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आनंदाश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त दिघे यांना अभिवादन करण्यासाठी लाखाे शिवसैनिक येत असतात. ही परंपरा आजही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दिघे यांच्या जीवनावर दाेन चित्रपट आले. त्यांचे कार्य एक-दाेन चित्रपटांत मावणारे नाही.
‘धर्मवीर भाग दाेन’ चित्रपट म्हणजे आनंद दिघे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे. त्यांनी दाखविलेल्या विचारांवरच आताचे सरकार सुरू आहे. मग शाळा प्रवेश किंवा अन्यायग्रस्ताला न्याय देण्याचे काम असाे, अशी सर्व कामे या सरकारकडून केली जात आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ याेजना, मुलींच्या माेफत शिक्षणाचा निर्णय असे महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याने गेल्या दाेन वर्षांत भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा काेणी आणू शकले नसल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
उपशहर प्रमुख जगदीश थाेरात आता शिंदे गटात
उद्धव ठाकरे गटातील कट्टर शिवसैनिक आणि ठाणे उपशहरप्रमुख जगदीश थाेरात यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा देत त्यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शिष्यांच्या रांगा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमात दिवंगत आनंद दिघे यांच्या तसबिरीला अभिवादन करण्यासाठी आले हाेते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबई, ठाणे आणि परिसरांतून अनेक शिवसैनिक, सामान्य नागरिक आले हाेते. एका महिलेने तिच्या मुलीला शाेधण्यासाठी उल्हासनगर पाेलिस टाळाटाळ करत असल्याची कैफियत मांडताच तिला तातडीने शाेधण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी फाेनद्वारे ठाणे पाेलिसांना दिले. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील एमएमआरडीएकडून काही जुन्या घरांवर कारवाई हाेत असल्याचे काँग्रेस आमदार हिरामण खाेसकर यांनी निदर्शनास आणून दिले. सध्या पावसाळ्यात कारवाई थांबविण्याचे आदेश शिंदे यांनी एमएमआरडीएच्या विभागीय आयुक्त सतेजकुमार खडके यांना यावेळी दिले.