ठाण्यात अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची संख्या गेली ४ हजार ७०५ च्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 03:52 PM2018-04-27T15:52:50+5:302018-04-27T15:52:50+5:30
ठाणे महापालिकेने केलेल्या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींच्या सर्व्हेत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धोकादायक इमारतींची संख्या ही तब्बल १ हजाराने वाढली आहे. तर अतिधोकादायक इमारतींची संख्या देखील मागील वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. येत्या काही दिवसात अतिधोकादायक प्रकारात मोडणाऱ्या इमारती खाली करुन त्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया पालिकेकडून केली जाणार आहे.
ठाणे - ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या अतिधोकादायक, धोकादायक इमारतींची यादी जाही केली आहे. त्यानुसार मागील वर्षी अतिधोकादायक ६९ इमारतींपैकी ५४ इमारती रिकाम्या करूनही यावर्षी अतिधोकादायक इमारतींची संख्या ही ९५ च्या घरात गेली आहे. सिंधी कॉलनी, म्हाडा कॉलनी आणि कामगार वसाहतीमधील धोकादायक इमारतींमुळे ही संख्या वाढली असल्याचे अतिक्र मण विभागाचे म्हणणे आहे. दुसरीकडे धोकायदाक इमारतीच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी १ हजारांनी वाढ झाली आहे. ठाणे शहरात सध्या ४ हजार ७०५ इमारती असून एवढ्या मोठ्या संख्येने धोकादायक असलेल्या या इमारतींमध्ये नागरिक आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
पावसाळ्यापूर्वी शहरात दरवर्षी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण करून या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसा देऊन इमारती रिकाम्या केल्या जातात. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तसेच काही इमारती तोडण्यात देखील आल्या आहेत. त्यामुळे यावर्षी धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींची संख्या काही होईल अशी अपेक्षा होती. मात्र ही संख्या कमी होण्याऐवजी वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी सिंधी कॉलनी, म्हाडा कॉलनी तसेच कामगार वसाहतीमधील देखील इमारतींचा समावेश केला गेल्याने इमारतींची संख्या यावर्षी वाढली आहे. प्रभाग समिती निहाय करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये शहरात ४ हजार ७०५ धोकादायक इमारतींची संख्या आहे. गेल्या वर्षी हीच संख्या ३ हजार ६९३ इतकी होती. त्यामुळे यावर्षी ही संख्या १हजारांनी वाढली आहे .
सी १ आणि सी २ ए श्रेणीमधील इमारती या अतिधोकादायक असल्याने त्या तात्काळ रिकाम्या करणे आवश्यक आहे. यावर्षी या अतिधोकादायक इमारतीची संख्या ९५ वर गेली आहे. हीच संख्या गेल्यावर्षी ६९ इतकी होती. तर सी २ ए इमारतींची संख्या यावर्षी ११४ असून गेल्यावर्षी ही संख्या ९१ इतकी होती. गेल्या वर्षी ५४ इमारती रिकाम्या करूनही यावर्षी ही संख्या ९५ वर गेली आहे . यावर्षी सी २ बी श्रेणीमधील इमारतींची संख्या ही २२६० इतकी असून सी ३ श्रेणीमधील इमारतींची संख्या २२३६ इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ५४ इमारती रिकाम्या करण्यात आल्या असल्या तरी यापैकी काही इमारती तोडल्या नाहीत तर काही इमारतींना कोर्टचा स्टे असल्याने या इमारतींची संख्या वाढली असावी अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
सर्वाधिक धोकादायक इमारती वागळे, मुंब्रा आणि दिव्यात
महापालिकेने केलेल्या सर्व्हेमध्ये सर्वाधिक इमारती या वागळे इस्टेट, दिवा आणि मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये आहेत. यामध्ये वागळे इस्टेट विभागात १३५५ इमारतींची संख्या आहे. मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीत १४५९ तर दिवा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये ८१९ इमारतींची संख्या आहे.
नौपाड्यात सर्वाधिक अतिधोकादायक इमारती -
जुने ठाणे अशी ओळख असलेल्या नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत सर्वाधिक अतिधोकादायक इमारतींची संख्या आहे. कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती एकत्रित केली असली तरी कोपरीमध्ये अशा इमारतींची संख्या फार कमी आहे. त्यामुळे या सर्व इमारती नौपाड्यामधील आहेत. गेल्या वर्षी नौपाड्यात ५३ अतिधोकादायक इमारतीची संख्या होती. हीच संख्या यावर्षी ६१ वर गेली आहे. ९ मीटर पेक्षा रु ंद रस्ते नसल्याने या सर्व इमारतींचा पुनर्विकास देखील रखडला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीमधील अतिधोकादायक इमारतींच्या संख्येत वाढ झाली आहे.
धोकादायक इमारतींच्या श्रेणी -
सी १ - या श्रेणीमधील इमारती या अतिधोकादायक असून या इमारती रिकाम्या करून निष्कासित केल्या जातात.
सी २ - या श्रेणीतील इमारती या रिकाम्या करून दुरु स्त करता येतात.
सी २ बी - या श्रेणीमधील इमारतींमध्ये रिहवासी राहत असले तरी त्या दुरु स्त करता येऊ शकतात.
सी ३ - या श्रेणीमधील इमारती या किरकोळ दुरु स्तीच्या असल्याने अशा इमारतींवर कारवाई केली जात नाही. मात्र दुरु स्त करण्याच्या सूचना दिल्या जातात.