Thane: प्रशांत जाधव हल्ल्याप्रकरणी एकाला अटक, प्रकरण गुन्हे शाखेकडे देण्याची भाजपची मागणी
By जितेंद्र कालेकर | Published: January 2, 2023 08:37 PM2023-01-02T20:37:49+5:302023-01-02T20:38:22+5:30
Thane News:
- जितेंद्र कालेकर
ठाणे - जपचे पदाधिकारी प्रशांत जाधव हल्ल्याप्रकरणी तीन दिवसांनंतर दहापैकी अमरिक राजभर (२९, रा. ठाणे) या आरोपीला वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला ५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याची मागणी पोलिस आयुक्त जयजित सिंह यांच्याकडे भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांनी केली.
पोलिस आयुक्त सिंह यांना दिलेल्या निवेदनामध्ये डावखरे आणि आ. केळकर यांनी म्हटले आहे की, कशिश पार्क आणि परिसरातील अतिक्रमणे तसेच गैरप्रकारांविरोधात भाजपच्या जाधव यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. याच कारणावरून त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. कशिश पार्क परिसरात काही दिवसांपूर्वी फलक लावण्यावरून त्यांना रोखण्यात आले होते. त्यावेळी वागळे इस्टेट पोलिसांकडे तक्रारही केली होती. मात्र, त्याची पोलिसांकडून दखल घेण्यात आली नाही. याच दरम्यान जाधव यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी पूर्वनियोजित कट रचून हल्ला करण्यात आला. याच हल्ल्यात आरोपी म्हणून ठाणे महापालिकेच्या दोन माजी नगरसेवकांसह काही कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. त्यात जाधव यांच्यावर समाजकंटकांनी हल्ला केल्याचे स्पष्ट दिसत आहे. धक्कादायक म्हणजे या फुटेजमध्ये एक पोलिस गणवेशात दिसत आहे. त्यामुळे पोलिसांसमोरच हा हल्ला झाल्याचेही निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
या प्रकरणाची वागळे इस्टेट पोलिसांकडून गंभीर दखल घेण्याची आवश्यकता होती. मात्र, हल्ला घडल्यानंतर अनेक तास उलटूनही गुन्हा नोंदविण्यात दिरंगाई झाली. त्यामुळे पोलिसांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप भाजपाच्या शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात भाजपचे प्रदेश सचिव संदीप लेले, माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्यासह पदाधिकाºयांचा समावेश होता. वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे संबंधित पोलिस अधिकारी दबावाखाली आहेत. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली.
जाधव यांच्यावरही विनयभंगाचा गुन्हा
जाधव यांना मारहाण करणारे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी अमरिक राजभर याला अटक झाली आहे. उर्वरित आरोपींचाही शोध घेण्यात येत आहे. तर जाधव यांच्यावरही हल्लेखारांपैकी एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.