Thane: अन्यथा बोलीभाषा मृतावस्थेत पडतील, राजन वेळुकर यांनी व्यक्त केली चिंता
By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 16, 2022 05:43 PM2022-10-16T17:43:18+5:302022-10-16T17:43:51+5:30
Rajan Velukar: पुस्तकांच्या माध्यमातून बोलीभाषा जीवंत ठेवल्या पाहिजेत, त्या देशभरात पोहोचविल्या पाहिजेत अन्यथा त्या मृतअवस्थेत पडतील असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजन वेळुकर यांनी केले.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : पुस्तकांच्या माध्यमातून बोलीभाषा जीवंत ठेवल्या पाहिजेत, त्या देशभरात पोहोचविल्या पाहिजेत अन्यथा त्या मृतअवस्थेत पडतील असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजन वेळुकर यांनी केले.
पाणिनीतर्फे आतिश सोसे यांनी लिहीलेल्या ‘महाराष्ट्रकन्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’ या चरित्रपर मराठी पुस्तकाच्या २४ भाषा, अनेक लिपी व नाट्यरुपांतर झालेल्या एकूण २८ पुस्तकांचा लोकार्पण सोहळा रविवारी पाणिनी सभागृहात संपन्न झाला. यावेळी वेळुकर यांनी पुस्तकांतून आपल्याला ज्ञान मिळत असते आणि ते संकलित करुन ठेवणे महत्त्वाचे असते असे सांगितले. पुस्तकाचे कौतुक करताना वेळुकर म्हणाले की, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चरित्र कमी पानांमध्ये लिहीणे कठिण आहे. प्रख्यात लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले म्हणाल्या की, बोलीभाषा संपत चालली आहे. ती नाकारली की ती संपणारच आहे अशी नाराजी व्यक्त केली. माजी राष्ट्रपती पाटील यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, त्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत.
राजकारणात तसे स्त्रीयांबद्दल मागून चांगले बोलले जात नाही. पण पाटील या त्याला अपवाद आहे. त्यांच्याबद्दल मागेही चांगलेच बोलतात. यावेळी त्यांनी लेखक सोसे यांचे कौतुक केले. माजी विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांनी देखील या माजी राष्ट्रपती पाटील यांच्या आठवणी उलगडताना या पुस्तकाचा प्रवास कथन केला. लेखक सोसे, प्रकाशिका संगीता चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, प्रशांत मानकर, मिलिंद सोनार, गुरुप्रसाद बर्वे, विश्वास मोहिते, अशोक हेमणे, श्रीकांत चव्हाण यांच्यासह अनुवादीत लेखकांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सुप्रसिद्ध लेखिका माधवी घारपुरे, प्रा. मेधा सोमण, सुप्रसिद्ध वृत्त निवेदिका वासंती वर्तक, प्रा. वि.सु. बापट व इतर उपस्थित होते. अस्मिता चौधरी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.