ठाणे, पालघरसह रायगडच्या जिल्हा रुग्णालयांचा आहारपुरवठा करणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 11:57 PM2020-03-04T23:57:23+5:302020-03-04T23:57:28+5:30

जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी आहारपुरवठा करणा-या राजर्षी शाहू नागरी सेवा सह. संस्थेला मागील नऊ महिन्यांपासून आहारसेवा देयक मिळालेले नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

Thane, Palghar and Raigad district hospitals will be closed | ठाणे, पालघरसह रायगडच्या जिल्हा रुग्णालयांचा आहारपुरवठा करणार बंद

ठाणे, पालघरसह रायगडच्या जिल्हा रुग्णालयांचा आहारपुरवठा करणार बंद

Next

पंकज रोडेकर 
ठाणे : जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी आहारपुरवठा करणा-या राजर्षी शाहू नागरी सेवा सह. संस्थेला मागील नऊ महिन्यांपासून आहारसेवा देयक मिळालेले नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ते १२ मार्च पूर्वी न मिळाल्यास संबंधित संस्थेने १२ मार्चपासून ठाणे, पालघर, रायगड या तिन्ही जिल्ह्यांतील रुग्णांना दिली जाणारी आहारसेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे. ही अवस्था ठाणे, पालघर किंवा रायगड जिल्ह्यातील रुग्णालयाची नसून ती राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर, निधी उपलब्ध होत नसल्याने हे देयक देण्यास उशीर होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्य आरोग्य भवनामार्फत गतवर्षी राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांतील रुग्णांना आहारपुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया पार पडली. यावेळी ३० संस्थांनी त्यात सहभाग घेतला होता. त्यातील ६ नागरी सेवा सहकारी संस्थांना राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये आहारपुरवठा करण्याबाबत ठेका हा दर निश्चित करून दिला आहे. त्यातच
एका संस्थेला चार ते पाच जिल्ह्यांतील रुग्णालयांना आहारपुरवठा करण्याचा ठेका दिला आहे. या संस्था
त्यात्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना नियमित आहारपुरवठा करीत आहेत. मात्र, जून २०१९ पासून
ते फेब्रुवारी २०२० या नऊ महिन्यांपासून आहारपुरवठा संस्थांना देयक
मिळाले नाही. त्यामुळे किराणा, दूध
व भाजीपाला या व्यापाऱ्यांचे
देणे बाकी असल्यामुळे पुरवठा केव्हाही बंद होऊ शकतो. तसेच देयकाची रक्कम १२ मार्चपूर्वी न मिळाल्यावर रुग्णालयातील आहारपुरवठा
बंद करण्यात येईल, असा इशारा संस्थेने उपसंचालक आरोग्यसेवा
मुंबई मंडळ, ठाणे आणि
जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय यांना निवेदनाद्वारे
दिला आहे.
>काय मिळते रुग्णांना
रुग्णालयात दाखल होणाºया एका रुग्णाला दिवसातून सकाळी नाश्ता, चहा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा आणि शेंगदाण्याचा लाडू तसेच रात्रीचे जेवण असा आहार दिला जातो. यासाठी ठेकेदाराला एक रुग्णाच्या मागे ११० रुपये मिळतात. तर, ठाणे जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांत ७५० ते ८०० रुग्ण असून त्यांच्यासाठी राजर्षी शाहू नागरी सेवा सहकारी संस्थाही आहार पुरविण्याचे काम करीत असून त्या संस्थेला नऊ महिन्यांपासून ६७ लाख ४६ हजार २५२ रुपये इतके देयक मिळलेले नाही.
>निधी उपलब्ध नसल्याने मागील नऊ महिन्यांपासून आहारसेवा देयकाची रक्कम मिळालेली नाही. गेल्या वर्षी अशा प्रकारे पाच महिन्यांनंतर देयक मिळाले होते. त्यातच नऊ महिन्यांचे देयक मिळावे, यासाठी सोमवारी काही संस्थांच्या अध्यक्षांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ते लवकरच मिळेल, असे आश्वासन दिले आहे.
- जनार्दन चांदणे, अध्यक्ष, राजर्षी शाहू नागरी सेवा सह. संस्था मर्यादित, ठाणे व पालघर
>आहार देयकांबाबत आरोग्य विभागाला लेखी माहिती दिली आहे. हे प्रकरण शासनस्तरावर आहे. तसेच संबंधित संस्थेने आहारसेवा बंद करू नये, असेही सांगितले आहे.
- डॉ. गौरी राठोड, उपसंचालक,आरोग्यसेवा, मुंबई मंडळ, ठाणे

Web Title: Thane, Palghar and Raigad district hospitals will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.