ठाणे-पालघरमध्ये ३१ खुनांसह सोनसाखळी चोरीच्या १३० गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश
By जितेंद्र कालेकर | Published: November 20, 2019 12:10 AM2019-11-20T00:10:00+5:302019-11-20T00:10:01+5:30
ठाणे आणि पालघर जिल्यातील गेल्या तीन वर्षामध्ये उघडकीस न आलेल्या ३१ खूनांसह सोनसाखळी चोरीच्या १३० गुन्हयांचा छडा लावण्याचे आदेश कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी काशीमीरा येथील गुन्हे आढावा बैठकीत तपास अधिका-यांना दिले आहेत.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीच्या होणा-या जबरी चो-या तसेच गेल्या तीन वर्षांमध्ये उघडकीस न आलेले खुनाचे गुन्हे सर्व प्रकारचे कौशल्य पणाला लावून उघडकीस आणण्याचे आदेश कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी ठाणे आणि पालघर जिल्यातील पोलिसांना सोमावरी दिले आहे. काशीमीरा येथे झालेल्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये त्यांनी हे आदेश दिल्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांतील तपास अधिकाऱ्यांची चांगलीच झोप उडाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे ग्रामीणच्या काशीमीरा भागातील एका खासगी सभागृहात १८ नोव्हेंबर रोजी कौशिक यांच्या उपस्थितीमध्ये पालघर आणि ठाणे ग्रामीण विभागातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांची गुन्हे आढावा बैठक पार पाडली. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या या बैठकीत २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांच्या कालावधीमधील गुन्ह्यांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील, पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण, वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर तसेच दोन्ही जिल्ह्यांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
* ४० पोलीस ठाण्यांच्या अधिका-यांची घेतली झाडाझडती
या बैठकीमध्ये ठाणे ग्रामीणमधील १७ पोलीस ठाण्यांचा तर पालघर जिल्ह्यांतील २३ पोलीस ठाण्यांचा आढावा त्यांनी घेतला. ठाणे ग्रामीणमध्ये गेल्या तीन वर्षांत खुनाच्या १४ गुन्ह्यांची उकल झालेली नाही. (२०१७ मध्ये ४, २०१८ मधील १ आणि २१९ च्या नऊ गुन्ह्यांचा यात समावेश आहे.) तर सोनसाखळी जबरी चोरीचे ६९ गुन्हे दाखल झाले. त्यातील ३० गुन्हे उघडकीस आले असून २९ गुन्ह्यांचा तपास अद्याप प्रलंबित आहे. पालघर जिल्ह्यांत गेल्या तीन वर्षांत खुनाच्या १७ गुन्ह्यांचा छडा लागलेला नाही. (२०१७ मध्ये २, २०१८ मधील ६ आणि २०१९ च्या नऊ गुन्ह्यांचा यात समावेश आहे.) तर सोनसाखळी जबरी चोरीचे १२९ गुन्हे दाखल झाले असून यातील केवळ २८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यातील अजूनही १०१ गुन्ह्यांची उकल झालेली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हे गुन्हे उघडकीस का नाही आले? त्याची कोणती कारणे आहेत? याचा खुलासाही त्यांनी संबंधित तपास अधिका-यांकडून मागितला. आता कोणतीही उत्तरे दिली तरी यापुढे या गुन्हयांचा तपास पूर्ण करा, असा आदेशही कौशिक यांनी दिला.
*तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत
खून आणि जबरी चोरीचे गुन्हे उघड न झाल्यामुळे संबंधित तक्रारदार आणि त्या फिर्यादींना पोलिसांकडून न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या कुटूंबांना कशाप्रकारे न्याय देता येईल. हे गुन्हे कशा प्रकारे उघड करता येतील. याबाबत अनेक प्रकारे कौशिक यांनी तपास अधिका-यांना मार्गदर्शन देखिल केले. पुन्हा होणाºया आढावा बैठकीमध्ये यातील जास्तीत जास्त गुन्हे उघड करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय, चो-या, वाहन चो-या आणि महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांवरही आळा घालण्याबाबत त्यांनी आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.