ठाणे-पालघरमध्ये ९ बळी, तीन वर्षीय बालिकेसह चौघांचा शोध सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:25 AM2017-08-31T00:25:11+5:302017-08-31T00:25:39+5:30

मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे ठाणे व पालघरमध्ये एकूण ९ जणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे.

Thane-Palghar has nine victims, three-year-old child has been explored | ठाणे-पालघरमध्ये ९ बळी, तीन वर्षीय बालिकेसह चौघांचा शोध सुरूच

ठाणे-पालघरमध्ये ९ बळी, तीन वर्षीय बालिकेसह चौघांचा शोध सुरूच

Next

ठाणे : मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे ठाणे व पालघरमध्ये एकूण ९ जणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट आणि नितीन कंपनी येथील नाल्याचा परिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी बुडालेल्या चौघांचे मृतदेह सापडले असून कोरम मॉलजवळील नाल्यात बुडालेल्या एका तीन वर्षीय मुलीसह तिघांचा शोध सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर पालघर जिल्ह्यात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मंगळवारी ठाणे शहरात दिवसभरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नाल्यांना आलेल्या पुरात कळव्यातील शांतीनगर, वागळे इस्टेटच्या रामनगर आणि जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळील नाल्यात बुडालेल्या चौघांचे मृतदेह गेल्या २४ तासांमध्ये मिळाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. कळव्यातील शांतीनगर भागात राहणारी रजिना शेख (३२) ही महिला मंगळवारी दुपारी मुसळधार पावसात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नाल्यात बुडाली. पोहता न आल्यामुळे तिचा बुडून मृत्यू झाला. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना तिचा मृतदेह मिळाला. तर येऊरच्या मामा भाचे डोंगरावर काही कामानिमित्त गेलेला शाहीद शेख (२८, रा. रामनगर) हा डोंगरावरील पाण्यात पाय निसटल्यामुळे पडला. तिथून तो वागळे इस्टेट मार्गावरील नाल्याने थेट चार ते पाच किलोमीटर लांब वाहून गेला. अग्निशमन दलाला रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला. इतर दोघांची नावे समजू शकली नाहीत. तर आपल्या वडिलांच्या हातातून कोरम मॉल परिसरातून निसटलेल्या तीन वर्षीय गौरी या मुलीचा शोध वागळे इस्टेट पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाकडून सुरू आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत तिचा शोध लागू शकला नव्हता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

वागळे इस्टेटमध्ये रास्ता रोको
मुसळधार पावसामध्ये अडकलेल्या कुटुंबाला वाचविण्याच्या प्रयत्नात नाल्यामध्ये वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्यात यंत्रणा कुचराई करीत असल्याचा आरोप करून वाल्मिकी समाज आणि भारिप-बहुजन महासंघाने बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले. वागळे इस्टेटमधील रामनगरात मुसळधार पावसामध्ये एक महिला आणि मुलगी घरात अडकून पडले होते.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांना वाचविण्यासाठी नाला ओलांडून जात असताना अजय आठवाल (वय २७) वाहून गेला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून युवकाचा शोध घेण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्न करीत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
या भागातील युवक मंगळवारपासून बेपत्ता युवकाचा नाल्यामध्ये उतरून शोध घेत आहेत. आपत्कालीन यंत्रणेतील कर्मचारी मात्र थातूरमातून पाहणी करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. वागळे इस्टेटमधील १६ नंबर सर्कलजवळ वाल्मिकी समाज आणि भारिप बहुजन महासंघाने रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर आपात्कालीन यंत्रणेच्या अधिकाºयांनी बेपत्ता युवकाचा कसून शोध घेण्याचे आश्वासन दिले.

ज्ञानसाधना नाल्याजवळ राहणारे गंगाराम बालगुडे (५०) यांनी नाल्यात पडलेला ड्रम घेण्यासाठी उडी घेतली होती. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास नाल्यातून बाहेर काढण्यात आला. याच नाल्यात आणखी एक जण बुडाल्याची भीती व्यक्त होत असून त्याचाही शोध घेण्यात येत आहे.
कोरम मॉल येथे कामाला असलेली दीपाली बनसोडे (२७) ही महिला पतीसमवेतच मॉलच्या बाहेर उभी होती. या दोघांमध्ये अवघ्या दहा फुटांचे अंतर होते. तिच्या कंबरेपेक्षा जास्त पाणी आल्यानंतर तिला पाण्याचा काहीच अंदाज न आल्यामुळे ती जवळच्याच नाल्यात पडली. यात ती वाहून गेली असून तिचाही शोध अद्याप सुरू आहे.
पावसाच्या पाण्यात वाहून गेलेला ४० ते ५० वर्षीय अनोळखी मृतदेह जिल्हा मध्यवर्ती कारागृह पाण्याच्या टाकीजवळील नाल्यात बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मिळाला.
ठाणे शहरातील मनोरमानगर, कोरम मॉल झोपडपट्टी, जिल्हा रुग्णालय परिसर, वागळे इस्टेट, मुंब्रा अशा वेगवेगळ्या भागांत पाण्यात आणि घरांमध्ये अडकलेल्या १०३ जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.
मानपाडा येथे प्रेस्टीज कंपनीची भिंत कोसळून ११ घरांचे नुकसान झाले. रेणू आणि कांचन यादव या महिला यात जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पालघरमध्ये पाच बळी
पालघर : डहाणू तालुक्यातील आंबेसरी पारसपाडा येथे नयना जाना गहला (५०) ही वृद्ध महिला शेतावरून घरी परतत असताना नाल्यामध्ये वाहून गली. जव्हार तालुक्यातील कोगदा येथील विनोद गणपत दळवी (२२) या तरुणाचा मंगळवारी सायंकाळी घरी परतत असताना नाल्यात पडून मृत्यू झाला आहे.
पालघरमध्ये मुसळधार पावसादरम्यान वाघोबा खिंडीत रात्रीच्या सुमारास धबधब्याकडील वळणावर असलेल्या डोंगराची दरड रस्त्यावर कोसळली.
यावेळी प्रवास करणाºया कुटुंबातील एका लहान मुलगी दरडीत सापडून मरण पावल्याची घटना घडली. तर पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तनिष्का राम बालशी (५) रा. वेवूर-पालघर, राजेश नायर, जेनिस कंपनी बोईसर यांचे मृतदेह सापडले आहेत.

Web Title: Thane-Palghar has nine victims, three-year-old child has been explored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.