ठाणे-पालघरचे पावणेसहा लाख वीजग्राहक अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:41 AM2021-05-19T04:41:46+5:302021-05-19T04:41:46+5:30
ठाणे : तौक्ते चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका ठाणे आणि पालघर जिल्ह्याला बसला आहे. मंगळवार सायंकाळपर्यंत ठाणे जिल्ह्यातील दोन लाख ...
ठाणे : तौक्ते चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका ठाणे आणि पालघर जिल्ह्याला बसला आहे. मंगळवार सायंकाळपर्यंत ठाणे जिल्ह्यातील दोन लाख ३५ हजार ५१९, तर पालघर जिल्ह्यातील तीन लाख ४४ हजार ७४३ ग्राहक अंधारात हाेते. दोन्ही जिल्ह्यातील सुमारे पाच ८० हजार २६२ ग्राहक अद्यापही अंधारात असून, त्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती महावितरणे प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
यात सर्वाधिक ग्राहक ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवलीच्या शहरीपट्ट्यासह अंबरनाथ-बदलापूर, शहापूर, मुरबाड, भिंवडीतील ग्रामीण भागातील आहेत. पालघर जिल्ह्यातल सर्वाधिक ग्राहक वसई-विरारसह पालघर आणि डहाणूसह जव्हार आणि वाडा तालुक्यातील आहेत.
तौक्ते चकीवादळात ठाणे जिल्ह्यातील सात लाख ८५ हजार ५१९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यापैकी मंगळवारी संध्याकाळपर्यंत जवळपास पाच लाख ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे, तर पालघर जिल्ह्यात पाच लाख ८८ हजार ७४३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यापैकी मंगळवारी संध्याकाळपर्यंत जवळपास दोन लाख ४४ हजार अशा सात लाख ९४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले असून, उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे.
विजेचे खांब पडणे, तारा तुटणेसह जोरदार वारा व मुसळधार पावसाने फिडर ट्रिप झाल्याने आणि रोहित्रात बिघाड झाल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.