Thane: ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे यांचे अपघाती निधन
By सुरेश लोखंडे | Updated: March 23, 2025 19:43 IST2025-03-23T19:43:19+5:302025-03-23T19:43:48+5:30
Thane News: ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे (३७) यांचे रविवारी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर अपघाती निधन झाले.

Thane: ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे यांचे अपघाती निधन
- सुरेश लोखंडे
ठाणे - येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे (३७) यांचे रविवारी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर अपघाती निधन झाले. कार्यालयीन मैत्रिणींसह त्या या ठिकाणी सहली निमित्त गेल्या होत्या. तेथील समुद्रकिनारी त्या लाटेत अचानक ओढल्या गेल्या, त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्वांच्याच मनाला चटक लावून गेली. आमच्या कुटुंबातील सतत हसत मुख व्यक्ती गेल्यामुळे तीव्र दु:ख झाल्याची भावना जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
ठाणे जिल्हा प्रशासनात २०१२ रोजी लिपिक या पदावर पल्लवी रुजू झाल्या होत्या. वर्षेभरापूर्वी मार्चमध्ये त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली होती. त्या सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध असलेल्या, सर्वांना हसत मुखाने सर्व प्रकारची मदत करणाऱ्या, अतिशय सुस्वभावी, मेहनती, प्रामाणिक, कामात तत्पर, चेहऱ्यावर कायम स्मित हास्य असलेल्या पल्लवी सरोदे यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सरोदे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे पती, सासू- सासरे आणि त्यांचा १३ वर्षाचा मुलगा आहे.
पतीला मदत करणाऱ्यांचे आभार मानायचे हाेते
त्यांचे पती काेकणाताील गांवी गणपतीसाठी गेले असता प्रवासात त्यांना ह्रदय विकाराचा झटका येऊन ते पडले हाेते. त्यावेळी त्यांना अन्य प्रवाश्यांनी वेळीच मदत करून रूग्णालयात दाखल केले. या संकटातून ते सुखरूप बचावले हाेते. दरम्यान या भयानक संकटात पतीला मदत करणाऱ्यां प्रवाशांना मला कसे भेटता येईल, त्यांचे मला आभार मानायचे आहे, अशी इच्छा त्यांनी त्यांच्या निकटवर्तीयांकडे व्यक्त केली हाेती