ठाण्याच्या उद्यानात सिंगापूर, अमेरिकेतील प्रसिद्ध शिल्पांची हुबेहूब प्रतिकृती ठरणार आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 01:35 AM2021-02-10T01:35:43+5:302021-02-10T01:36:01+5:30
कशिश पार्क येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले लोकार्पण
ठाणे : सिंगापुरात जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या सुप्रसिध्द ‘गार्डन बाय द बे’ या उद्यानातील बेबी स्कल्पचर व अमेरिकेतील जॉय ऑफ म्युझिक स्कल्पचर अशा आंतरराष्ट्रीय शिल्पांची हुबेहूब प्रतिकृती ठाण्यातील कशिश पार्क येथे नव्याने लोकार्पण झालेल्या महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उद्यानात साकारण्यात आले आहे. या उद्यानाचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले असून, हे उद्यान कशिश पार्कवासीयांसाठीच नाही, तर सर्व ठाणेकरांसह इतर शहरांतून येणाऱ्या नागरिकांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून परिचित होईल असे गौरवोद्गार शिंदे यांनी यावेळी काढले.
ठाण्याच्या प्रभाग क्र.१९ मधील तीनहात नाका ते ॲपलब सर्कल, एल.बी.एस. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा आणि रहेजा गृहसंकुलालगतच्या सेवारस्त्याच्या डांबरीकरणाच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला. यामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले ते डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उद्यानाचा लोकार्पण सोहळा. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व स्थानिक शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले-जाधव यांच्या प्रयत्नातून हे उद्यान साकारण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त मुख्यालय (उद्यान) विजयकुमार म्हसाळ, वरिष्ठ उद्यान निरीक्षक केदार पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्यानाच्या प्रतिकृतीची कीर्ती पसरेल, तसेच ठाणे महानगरपालिकेच्या विकासनिधीचा सुयोग्य वापर कसा करावा, याचे हे उत्तम उदाहरण असल्याची पोचपावती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.