ठाणे एकात झाले पास, दुसऱ्यात एकदम नापास..!

By अजित मांडके | Published: January 29, 2024 01:27 PM2024-01-29T13:27:15+5:302024-01-29T13:28:56+5:30

Thane: ठाणे महापालिकेने हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्याने आता कुठे शहराची हवा सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे. हवा प्रदूषणात पास झालेली ठाणे महापालिका ध्वनी प्रदूषण रोखण्यात नापासच झाल्याचे म्हणावे लागेल. महापालिकेच्या पर्यावरण अहवालाने हे अधोरेखित केले आहे. 

Thane passed in one, totally failed in the other..! | ठाणे एकात झाले पास, दुसऱ्यात एकदम नापास..!

ठाणे एकात झाले पास, दुसऱ्यात एकदम नापास..!

- अजित मांडके 
(प्रतिनिधी)

ठाणे महापालिकेने हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्याने आता कुठे शहराची हवा सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे. हवा प्रदूषणात पास झालेली ठाणे महापालिका ध्वनी प्रदूषण रोखण्यात नापासच झाल्याचे म्हणावे लागेल. महापालिकेच्या पर्यावरण अहवालाने हे अधोरेखित केले आहे. 
शहरात रस्त्यांची, गृहसंकुलांची, मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने शहराच्या विविध भागांत वाहतूककोंडी होत असून, त्यामुळे वाहनांच्या हॉर्नमधून ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. शांतता क्षेत्रातही ध्वनीपातळी वाढली आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण रोखण्यात महापालिका कमी पडली का? असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ठाणे शहर हे औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर असलेले शहर आहे. १८६३ मध्ये नगर परिषदेची स्थापना झाली तेव्हा शहराची लोकसंख्या नऊ हजार होती. जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाख ३७ हजार एवढी आहे. शहरात मागील काही वर्षांत विकासकामे झपाट्याने सुरू झाली. मोठमोठी गृहसंकुले उभी राहू लागली, त्यात घोडबंदर भागात मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. 

महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांची कामे दिवसरात्र सुरू आहेत. शहरातील वाहनांची संख्या २५ लाखांहून अधिक आहे. दरवर्षी रस्त्यांवर येणाऱ्या नवीन वाहनांची संख्या ८ ते १० टक्क्यांंनी वाढत आहे. वाहनांची संख्या वाढत असताना शहरातील रस्त्यांचा आकार तोच आहे. शहरातील अनेक रस्त्यांची रुंदी कमी आहे, ठाणे शहरातून मुंबई, गुजरात, नाशिक, भिवंडी या ठिकाणी जाता येत असल्याने रोज शहरातील रस्त्यांवर लाखो वाहने ये-जा करतात. 

घोडबंदर भागात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे सकाळपासून वाहतूककोंडी सुरू होते, ती रात्री १० नंतरही तशीच असल्याचे चित्र माजिवडा, मानपाडा, कापूरबावडी, पातलीपाडा आदी भागांत दिसून येते. सायंकाळी वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे अक्षरश: डोके ठणकायला लागते. त्यावर महापालिका किंवा वाहतूक पोलिसांना अंकुश लावता आलेला नाही. वाहतूककोंडी, विनाकारण हॉर्न वाजवल्यामुळे, बांधकामाची कामे सुरू असल्याने, सण-उत्सवानिमित्त मोठ्या आवाजात वाजणारे डीजे आदींमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष पर्यावरण अहवालात काढण्यात आला आहे. महापालिकेने शहरातील २० चौकांचे सर्वेक्षण केले, त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले. 

गणेशोत्सव व दीपावलीच्या काळात ध्वनी प्रदूषणाची तीव्रता ही मर्यादेपेक्षाही अधिक आढळून आली आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध स्वरूपाचे उपाय केले जात असल्याचा दावा केला जातो. परंतु त्याची अंमलबजावणी कुठेही होताना  दिसत नाही.  उलट ध्वनी प्रदूषणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच महापालिका हवा प्रदूषण रोखण्यात पास  झाली असली, तरी ध्वनी प्रदूषण रोखण्यात नापास झाली, असेच म्हणावे लागेल.

Web Title: Thane passed in one, totally failed in the other..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे