ठाणेकरांनी लुटला गुलाबी थंडीचा अनुभव, ठाण्यात १९.०४ अंश तापमानाची नोंद
By अजित मांडके | Published: January 16, 2024 04:35 PM2024-01-16T16:35:29+5:302024-01-16T16:35:41+5:30
यंदाच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना संपून जानेवारी महिना उजाडला तरी, थंडीचा आनंदापासून ठाणेकर मुकले होते.
अजित मांडके (ठाणे)
ठाणे : यंदाच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना संपून जानेवारी महिना उजाडला तरी, थंडीचा आनंदापासून ठाणेकर मुकले होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सर्वात कमी २०.२ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर पुन्हा उकाडा वाढल्याने ठाणेकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागले होते. अशातच अचानकपणे सोमवारी सायंकाळ पासून तापमानाचा पार घसरू लागल्याने वातवरणात गारवा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी पहाटे ४ वाजता २१.१ तर, सकाळी ६ वाजता सर्वात कमी १९.४ अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे उशिरा का होईना पण यंदा ठाणेकरांना गुलाबी थंडी अनुभवता आली.
ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर हिट अर्थात उन्हाचा तडका सहन केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून चाहूल लागते ती थंडीची. मात्र, यंदाच्या वर्षी नोव्हेम्बर आणि डिसेंबर महिना उलटून देखील थंडीचा अनुभव घेता आला नाही. त्यात नव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातील गुरुवारी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ठाण्यात सरासरी तापमान ३० अंश सेलसिअस इतके होते. संध्याकाळनंतर हळूहळू तापमानाचा पारा खाली उतरत गेला. हा पारा उतरतच राहिल्याने ठाणेकर नागरिकांनी यंदाच्या हिवाळ्यातील थंडीचा अनुभव घेतला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी हा पारा २० अंशाच्या आसपास गेला.
सकाळी ६.३० वाजता २०.२ अंश तापमानाची नोंद झाली. त्यानंतर पुन्हा ताम्पानात वाढ होत गेल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. त्यात मागील दोन ते तीन दिवसापासून वातवरणात उकडा अधिक वाढल्याने नागरिकांना घामाच्या धारा आणि अंगाची लाहीलाही होत होती. अशातच सोमवरी सायंकाळ ५ वाजेपासून वातवरणात गारवा निर्माण होऊ लागला होता. रात्री ९ वाजेनंतर गारवा आणखी वाढल्याने थंडीची चाहूल लागली. तर, मंगळवारी पहाटे २१.१ इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. त्यानंतर ताम्पानात आणखी घसरण झाल्याने वातवरणात देखील कमालीचा गारवा वाढल्याचे दिसून आले. सकाळी ६ वाजता यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी म्हणजे १९.४ अंश तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी ऊबदार कपडे घालून बाहेर पडल्याचे दिसून आले. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना या थंडीचा आनंद घेता आला. तर, या पडलेल्या गुलाबी थंडीमुळे शहरात ठिकठिकाणी धुक्याची चादर पसरली होती. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासून पडलेल्या या थंडीने ठाणेकर नागरिक सुखावले आहेत.