ठाण्यात रात्रीस चाले खड्डे बुजवण्याचा खेळ, पालकमंत्र्यांसह आयुक्तांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 03:39 AM2018-08-30T03:39:39+5:302018-08-30T03:40:46+5:30
विरोधकांनी खड्डे बुजवण्याच्या कामाचेही बॅनर लावावेत
ठाणे : रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्यांवरून वारंवार टीका होऊ लागल्यानंतर ठाणे महापालिकेने दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या मोहिमेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा मंगळवारी रात्री पालिका प्रशासनासमवेत रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. त्यानुसार, पहाटे ३ वाजेपर्यंत खड्डे बुजवण्याची मोहीम शहराच्या विविध भागांत सुरू होती.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून खड्डे बुजवण्यासाठी विविध तंत्रज्ञानांचा अवलंब केला जात आहे. त्यात येत्या काही दिवसांवर महापौर वर्षा मॅरेथॉन आणि गणेशोत्सव सण येऊ लागल्याने आणि पालिका प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर खड्ड्यांच्या मुद्यावरून टीकेची झोड उठू लागल्याने अखेर पालिकेने ते बुजवण्याच्या मोहिमेला वेग आणला आहे. मंगळवारपासून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा रात्रीच्या वेळी रस्त्यावर उतरली असून वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून रात्रीच्या वेळी ते भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू झाली.
महत्त्वाचे म्हणजे शहरामध्ये येणारे आणि बाहेर जाणारे रस्त्यांवर लक्ष केंद्रित करून ते भरण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार, मंगळवारी रात्री आनंदनगरनाका, तीनहातनाका पूल, नितीन कंपनी पूल, कॅसल मिल, मानपाडा जंक्शन, दोस्ती इम्पिरिया, ब्रह्मांड, कोलशेत, ढोकाळीनाका, श्रीरंग सोसायटी, एसटी कार्यशाळा, खारटन रोड, मल्हार सिनेमा चौक आदी ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम पहाटे ४ पर्यंत सुरू होते. या सर्व ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पहाटे ३ पर्यंत पाहणी करून खड्डे बुजवण्याचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे की नाही, याची पाहणी केली. ही मोहीम तीन दिवस चालणार असून आयुक्त स्वत: तीनही रात्री या कामाची पाहणी करणार असून त्यांच्या कामाचे एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.
खड्ड्यांच्या मुद्यावरून बॅनर, पोस्टर लावून विरोधक टीका करत आहेत. मग महापौर, आयुक्त हे स्वत: रस्त्यावर उतरून खड्डे बुजवत आहेत. च्त्यांचेही बॅनर त्यांनी लावावेत, अशी खोचक टीका पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्रॅफिक पार्कच्या लोकार्पणाच्या निमित्ताने केली.