ठाणे पोलिसांची कारवाई: तडीपारीचा आदेश मोडणारे दोन नामचीन गुंड पुन्हा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 06:20 PM2018-01-31T18:20:42+5:302018-01-31T18:47:04+5:30
यापूर्वी दोन वेळा ठाणे, मुंबईतून तडीपार झालेल्या अक्षय शिंदे तसेच सचिन कांबळे अशा दोन नामचीन गुंडांना ठाणे पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले आहे. हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
ठाणे: खूनाचा प्रयत्न, हाणाम-या आणि जबरी चो-यांमध्ये ठाणे, रायगड, नवी मुंबई आणि मुंबई उपनगरांमधून हद्दपार केलेल्या अक्षय उर्फ अन्वर रोहिदास शिंदे (२३, रा.पारशेवाडी, कोपरी) आणि कान्या उर्फ सचिन सुभाष कांबळे (रा. वागळे इस्टेट, ठाणे) या दोन नामचीन गुंडांना ठाणे पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले आहे. या दोघांविरुद्ध अनुक्रमे नौपाडा आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कान्या उर्फ सचिन कांबळे याच्यावर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यामध्ये एक खूनाचा प्रयत्न तसेच हाणामारीचे सात असे आठ गुन्हे दाखल आहेत. त्याने वागळे इस्टेट परिसरासह ठाणे शहरात दहशत पसरवली होती. त्यामुळेच वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी त्याला ठाणे, मुंबई, रायगड आणि नवी मुंबई जिल्हयातून १ एप्रिल २०१७ रोजी दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. याच आदेशाचा भंग करुन तो ठाणे शहरात बिनधास्तपणे वावरत होता. तो वागळे इस्टेट भागातील रामचंद्रनगर येथे येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ठाकरे यांच्यासह निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, हवालदार आनंदा भिलारे, संदेश चौधरी, ए. एस. कांबळे आणि टी. एन. पठाण आदींच्या पथकाने त्याला २८ जानेवारी २०१८ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पुन्हा अटक केली. त्याला वागळे इस्टेट पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
कोपरीच्या पारशेवाडी भागातील रहिवाशी असलेला अक्षय उर्फ अन्वर शिंदे याच्यावर कोपरी पोलीस ठाण्यात २० तर नौपाडा पोलीस ठाण्यात दोन असे २२ गुन्हे दाखल आहेत. चोरी, जबरी चोरी, हाणामारी, खूनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्हयांचा यामध्ये समावेश आहे. कोपरीत अलिकडेच एकावर त्याने तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न केला होता. याच प्रकरणात त्याची १८ जानेवारी २०१८ रोजी जामीनावर सुटका झाली होती. सुटका झाल्यानंतर त्याने अन्य दोन साथीदारांसह ठाण्यातील तीन हात नाका येथे एका रिक्षा चालकाकडून मोबाईल आणि काही पैसे लुबाडले होते. यात चेतन मायरेकर या त्याच्या साथीदाराला नौपाडा पोलिसांनी पकडले होते. अक्षय शिंदे मात्र पोलिसांना हुलकावणी देत होता. दरम्यान, त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गंभीर स्वरुपाच्या गुन्हयांची दखल घेऊन वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्तांनी त्याला यापूर्वी दोन वेळा ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्हयामधून हद्दपार केले होते. हद्दपार असतांनाच कोपरीत त्याने खूनाचा प्रयत्न केला. तर नौपाडयात जबरी चोरीचा प्रयत्न करुन तो पसार झाला होता. तो कोपरी पारशेवाडी भागात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिरीष यादव यांच्या पथकाने ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुन्हा जेरबंद केले. त्याच्यावर १४२ नुसार कारवाई करुन अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.