गुजरातच्या सीमेवरून मोटारसायकल चोरटयाला ठाणे पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 10:20 PM2019-07-10T22:20:29+5:302019-07-10T22:26:25+5:30
ठाण्यातील मोटारसायकलींची चोरी करुन गुजरातमध्ये पसार झालेल्या शैलेश ऊर्फ सुजित रतनशी शाह या चोरटयाला ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
ठाणे : शहरातील गजबजलेल्या ठिकाणी उभी केलेल्या मोटारसायकलची रेकी करून नंतर हेल्मेट परिधान करून तिची चोरी करणाऱ्या शैलेश ऊर्फ सुजित रतनशी शाह (२२, रा. चरई, ठाणे) या अट्टल चोरट्यास गुजरातच्या सीमेवरून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली. त्याच्याकडून दोन लाख ६० हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
ठाणे शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहन तसेच मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांचा छडा लावण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. याच अनुषंगाने ठाणे परिमंडळाचे पोलीस उपायुक्त बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि उपनिरीक्षक महेश कवळे आदींच्या पथकाने शैलेश याला गुजरातमधील उमरगा भागातील सोलसुंबा गावातून २८ जून २०१९ रोजी ताब्यात घेतले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याची पक्की खबर नौपाडा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे सहायक पोलीस निरीक्षक मोरे, उपनिरीक्षक कवळे, पोलीस हवालदार महेश भोसले, पोलीस नाईक प्रसाद निकुंभ, हरीश तावडे, गोविंद पाटील, भागवत थाविल आणि पोलीस कॉन्स्टेबल गोरखनाथ राठोड आदींच्या पथकाने त्याला अटक केली. दुचाकीची चोरी केल्यानंतर हेल्मेट घालून तो पळून जायचा. त्यामुळे पोलिसांनाही त्याच्यावर संशय येत नव्हता. त्याने याआधी ठाणे शहर आणि नवी मुंबई परिसरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले आहेत.
नवी मुंबई पोलिसांनीही केली होती यापूर्वी अटक
नौपाड्यातील दोन, बदलापूर, उल्हासनगर आणि शिवाजीनगर या भागातून प्रत्येकी एक अशा पाच मोटारसायकल चोरीची कबुली त्याने दिली असून या पाचही दुचाकी त्याच्याकडून हस्तगत केल्या आहेत. यापूर्वी नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागानेही त्याला अटक केली होती. त्यावेळीही पाच ते सहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे त्याच्याकडून उघड झाले होते. त्याच्याकडे असलेल्या पाच चोरीच्या मोटारसायकली तो अल्प किमतीमध्ये विक्री करण्याच्या तयारीत असतांनाच नौपाडा पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले असून त्याच्याकडून आणखीही मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.