नागपुरमधील न्यायालयाच्या आवारातून फरार झालेल्या आरोपीला ठाणे पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 04:56 PM2018-02-24T16:56:58+5:302018-02-24T16:56:58+5:30
नागपुर येथील न्यायालयाच्या आवारातून फरार झालेल्या आरोपीला ठाणे पोलिसांना ठाण्यातून अटक केले आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला नागपुर पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे.
ठाणे - नागपूर मध्ये जबरी चोरी करून न्यायालयाच्या आवारातून ठाण्यात पळून आलेल्या एका १८ वर्षीय आरोपीला ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने अटक केली आहे.
या आरोपीचे नाव राहुल प्रकाश गायकवाड (१८) असे असून तो नागपूरमधील महाकाली नगरमध्ये वास्तव्याला आहे. जबरी चोरीच्या गुन्ह्यात नागपूरच्या धंतोली पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी त्याला अटक केले होते. २१ फेब्रुवारी रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र सायंकाळी पोलिसांच्या हातावर तुरी देत राहुल पळून गेला होता. मात्र तो ठाण्यात आला असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे शोध कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी आरोपीला ठाण्यातील विवियाना मॉल परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरु द्ध नागपूरमध्ये आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या आरोपीला नागपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.