शिवीगाळ केल्याच्या रागातून ठाण्यातील ‘त्या’ सफाई कामगाराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:12 PM2018-09-14T22:12:22+5:302018-09-14T22:27:43+5:30
क्षुल्लक कारणावरुन अनिल गाडेकर (२७) या सफाई कामगाराचा खून करणाऱ्या सनी ऊर्फ गब-या मोरे याला वर्तकनगर पोलिसांनी अखेर चार दिवसांनी अटक केली.
ठाणे : शिवीगाळ केल्याच्या रागातून भीमनगर येथील अनिल गाडेकर (२७) या सफाई कामगाराचा खून करणा-या सनी ऊर्फ गब-या मोरे याला वर्तकनगर पोलिसांनी अखेर चार दिवसांनी गुरुवारी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. त्याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
भीमनगर भागातील एका सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर अनिल याचा खून केल्याची घटना १० सप्टेंबर २०१८ रोजी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. वर्तकनगर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू होता. पोखरण रोड क्रमांक-२ भागातील रेप्टाकोर्स कंपनीमध्ये सफाई कामगार असलेल्या अनिल याला दारूचेही व्यसन होते. पण, नेमके मारेकरी कोण, याचा काहीच धागादोरा लागत नव्हता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी यासाठी तीन पथके तयार केली होती. १५ ते २० संशयितांकडे चौकशी करून घटनास्थळाजवळचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले होते. ९ सप्टेंबर रोजी रात्री सन्नी ऊर्फ गब-या मोरे याचे दोन मुलांबरोबर भांडण झाले होते. घटना घडल्यापासून गब-या पसार झाला असल्याची टीप शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना मिळाली. याच माहितीच्या आधारे गब-यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. १३ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वा.च्या सुमारास हाजुरी पाइपलाइन येथे पगाराचे पैसे घेण्यास तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गायकवाड यांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. ९ सप्टेंबर रोजी गप्पा मारतानाच अनिलने शिवीगाळ केल्याच्या रागातून त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. आरोपीबाबत कोणताही धागादोरा नसताना सलग चार दिवस मेहनत घेऊन खुनाचा छडा लावणाºया तपास पथकाचे उपायुक्त अंबुरे यांनी विशेष कौतुक केले.