बांग्लादेशातील मस्जिदमध्ये गावठी बॉम्बने स्फोट घडवून भारतात घुसखोरी करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 08:35 PM2020-03-24T20:35:44+5:302020-03-24T21:49:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : बांग्लादेशातील तीन मस्जिदींमध्ये गावठी बॉम्बने स्फोट घडवून आणणाºया आणि भारतात घुसखोरी करुन वास्तव्य करणाºया ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: बांग्लादेशातील तीन मस्जिदींमध्ये गावठी बॉम्बने स्फोट घडवून आणणाºया आणि भारतात घुसखोरी करुन वास्तव्य करणाºया मोफाज्जल हुसेन उर्फ मोफाअली गाझी उर्फ मिफजूल कोराअली मंडल (४२) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने नवी मुंबईतून अटक केल्याची माहिती मंगळवारी दिली. त्याला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यालयाने दिले आहेत.
बांग्लादेशातून भारतामध्ये घुसखोरी करुन एक व्यक्ती ठाण्यात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ठाण्यातील सिडको बस स्टॉप येथे सापळा लावून मंडल याला १९ मार्च रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. तो बांग्लादेशी घुसखोर असल्याची माहिती चौकशीमध्ये उघड झाली. त्याने २००२ मध्ये बांग्लादेशातील खुलणा राज्यातील इलिसपूर गावातील एका मस्जिदमध्ये एक तर मस्जिदीबाहेर दोन असे तीन गावठी बॉम्बचे स्फोट घडवून आणले होते, अशी कबुलीही पोलिसांना दिली. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यु झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. हा स्फोट घडवून आणताना एक बॉम्ब त्याच्या हातातच फुटल्याने त्याचा एक हात तुटला होता. त्यानंतर स्थानिक बांग्लादेश न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, २००४ मध्ये बांग्लादेशच्या उच्च न्यायालयाने त्याला वैद्यकीय उपचारासाठी जामीनावर मुक्त केले होते. तेंव्हापासून तो बांग्लादेशातून पसार झाला होता. दरम्यान, २००४ पासून तो पश्चिम बंगाल राज्यात मफीजूल केराअली मंडल या नावाने वास्तव्य करीत असल्याची बाब चौकशीत समोर आली. त्यानंतर अटक टाळण्यासाठी आणि शिक्षेपासून बचाव करण्यासाठी भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी करुन तो पश्चिम बंगाल राज्यात वास्तव्य करीत होता. तिथे तो बिगारी आणि मजूरीचे काम करुन उदरनिर्वाह करीत होता. मजूरीसाठी मुंबई आणि नवी मुंबई भागात तो ये-जा करीत होता. तो ठाण्यात येणार असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक आणि पोलीस हवालदार आबुतालीब शेख यांच्या पथकाने त्याला ठाण्यातील सिडको बस थांबा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे भारतात येण्यासाठी आवश्यक असलेले पारपत्र, व्हिसा तसेच इतर कोणतीही आवश्यक कागदपत्रे नव्हती. त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात भारतीय पारपत्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सरक हे करीत आहेत. सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि उपनिरीक्षक सरक यांच्या पथकाने ही कारवाई केली.