संचित रजा घेऊन पसार झालेल्या मध्यप्रदेशातील कैद्याला ठाणे पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:27 PM2018-08-03T22:27:08+5:302018-08-03T22:36:09+5:30
गेल्या १४ वर्षांपासून फरार असलेल्या मध्यप्रदेशातील खूनाच्या गुन्हयातील कैद्याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने भिवंडीतून १ आॅगस्ट रोजी अटक केली आहे.
ठाणे: मध्यप्रदेशातील जबलपूर मध्यवर्ती कारागृहातील खूनाच्या गुन्हयातील कैदी नैमुद्दीन काझी (५३) हा संचित (पॅरोल) रजेवर सुटल्यानंतर पुन्हा परत न जाता पसार झाला होता. त्याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने तब्बल १४ वर्षांनी भिवंडीतून १ आॅगस्ट रोजी अटक केली. त्याला मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मध्यप्रदेशातील एका खून प्रकरणात १५ फेब्रुवारी २००१ रोजी काझीला छिंदवाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याच शिक्षेसाठी त्याला कारागृहात ठेवले होते. ही शिक्षा भोगत असतांना १४ डिसेंबर २००४ ते २८ डिसेंबर २००४ या ११ दिवसांच्या पॅरोल रजेवर त्याला कारागृहाने सोडले होते. ही रजा संपल्यानंतर पुन्हा कारागृहात परतणे अपेक्षित असतांना तो परस्पर पसार झाला होता. याप्रकरणी मध्यप्रदेशातील पांडुरना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झालेला आहे. गेल्या १४ वर्षांपासून पसार असलेल्या या कैद्याचा छिंदवाडा आणि मध्यप्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून शोध घेण्यात येत होता. तरीही तो पोलिसांना हुलकावणी देत होता. तो त्याच्या भिवंडीतील निजामपूर भागातील दूधनाका येथे एका मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार जगदेव यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सापळा रचून १ आॅगस्ट रोजी ७.२० वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी पांडुरना (छिंदवाडा, मध्यप्रदेश) पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या पथकाने केली.